कोल्हापूर : ‘दप्तर घेऊन फरारी’ म्हणून पोलिसांत गुन्हा दाखल असतानाही खोट्या माहितीच्या आधारे महापालिकेच्या इस्टेट विभागात ठोक मानधनावर भरती होऊ पाहणाऱ्या तलाठी प्रकाश कोळी यांना कामावर घेऊ नका. खोट्या माहितीच्या आधारे कोळी यांनी मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करा, या मागणीचे निवेदन ‘सत्यमेव जयते’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समीर पठाण यांनी महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना आज, शुक्रवारी दिले.महापालिकेने ८ आॅगस्ट २०१४ ला मौखिक मुलाखतीद्वारे दहा हजार रुपये ठोक मानधनावर तलाठी प्रकाश कोळी यांना सहा महिन्यांसाठी इस्टेट विभागात तलाठी म्हणून नेमणुकीचे पत्र दिले आहे. प्रकाश कोळी हे १२ जानेवारी २०१२पासून गैरहजर आहेत. त्यांनी अद्याप तलाठीपदाचा राजीनामा दिलेला नाही. कोळी यांच्यावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात ‘दप्तर घेऊन फरार’ अशी फिर्याद दिलेली आहे. त्यावेळेपासून कोळी फरारी आहेत. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यात कामाचा ‘प्रकाश’ पाडणाऱ्या कोळी यांची महापालिकेत नेमणूक करू नका, अशी विनंती ‘सत्यमेव जयते’तर्फे करण्यात आली. कोळी यांनी महापालिकेला खोटी माहिती देऊन नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणीही संस्थेने केली आहे. (प्रतिनिधी)
सत्यमेव जयते : आंदोलनाचा इशारा
By admin | Updated: December 6, 2014 00:27 IST