रमेश पाटील
कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक केव्हा होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून या निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी आता सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत अवघ्या १०० ते २५० मतांनी पराभव झाल्याचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले असून, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत पुन्हा एकदा त्यांची निवडणुकीच्या आखाड्यात खडाखडी होणार हे निश्चित आहे. करवीर तालुक्यातील ३०, पन्हाळा तालुक्यातील १८, शाहूवाडीतील १०, गगनबावडा १४, हातकणंगले ३२, राधानगरी १४ व कागल तालुक्यातील ४ अशा एकूण १२२ गावांत ‘राजाराम’चे कार्यक्षेत्र आहे. गेली २५ वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे कारखान्याची सत्ता आहे. यापूर्वीच्या सर्व निवडणुका महादेवराव महाडिक यांनी एकतर्फी जिंकल्या. मात्र २००९ ची निवडणूक महाडिक यांना काहीशी जड गेली; कारण विरोधी गटाची धुरा मंत्री सतेज पाटील यांच्याकडे होती. त्यानंतर २०१५ च्या निवडणुकीतही चांगलीच रंगत वाढली होती. संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. मात्र अवघ्या १०० ते २५० मतांनी मंत्री पाटील यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलचा पराभव झाला; तर कमी मताधिक्याने विजय झाल्याने सत्तारूढ गटाला धक्का बसला. त्यामुळे सत्तारूढ गट आता या निवडणुकीसाठी अधिक सावध झाला आहे.
दरम्यान, मागील म्हणजेच २०१५ च्या निवडणुकीत आपल्याला कोणत्या गावात मताधिक्य मिळाले, कोणत्या गावात मताधिक्य मिळाले नाही, याचा अभ्यास सत्तारूढ आणि विरोधी गटांकडून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, त्याची दुरुस्ती करण्यात येऊ लागली आहे. कार्यक्षेत्रातील गावांतील प्रमुखांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्यामार्फत मतदारांपर्यंत पोहोचणे, आदी कार्यक्रम दोन्ही गटांकडून सुरू झाले आहेत. ‘राजाराम’च्या निवडणुकीबरोबरच गोकुळ व जिल्हा बँकेची मागेपुढे निवडणूक असणार आहे.
दरम्यान, कारखान्याच्या १३८९ सभासदांच्या नावावर जमीन नाही; तर काही सभासद कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील असल्याच्या कारणांमुळे तत्कालीन प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी साखर सहसंचालक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनुसार १५ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना अपात्र ठरविले. त्यामुळे सत्तारूढ गटाला मोठा धक्का बसला. आता हा वाद पुन्हा न्यायालयात गेला आहे.
चौकट :
दृष्टिक्षेप....
कार्यक्षेत्र : करवीर, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, कागल.
सभासद : १८७३२
संचालक : १९
सध्या सत्ता : माजी आमदार महादेवराव महाडिक विरोधक- राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी.
...................................
चौकट : सत्तारूढ गटात काही नवीन चेहरे...
सत्तारूढ गटाचे माजी आमदार महादेवराव महाडिक हे प्रत्येक निवडणुकीत किमान सात ते आठ नवीन चेहऱ्यांना आपल्या पॅनेलमध्ये घेतात. यंदाही ते असा बदल करतील, अशी चर्चा आहे.