संकेश्वर : शासनाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून नगरपालिकेतर्फे शहराला मीटर लावून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आता नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार असून नळांना तोटी बसविणे सक्तीची केली जाणार आहे, अशी महिती आमदार उमेश कत्ती यांनी दिली.
पालिकेच्या सभागृहात पाणीपुरवठा विभागाच्या आयोजित खास बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सीमा हतनुरे होत्या.
कत्ती म्हणाले, सध्या जुन्या पद्धतीने कर आकारणी केली जाते. मात्र, २४ तास पाणी योजनेमुळे प्रत्येक नळधारकास प्रति महिना ७ हजार लीटर पाण्यास ५६ रुपये, ८ ते १५ हजार लीटरसाठी १२० रुपये, १५ ते २५ हजार लीटरसाठी २२४ तर २५ हजारांच्या पुढे प्रति हजारी ५२ रुपये माेजावे लागणार आहेत.
शहरात ६५९४ नळधारक असून त्यामध्ये २१२ नळधारक हे संस्थेचे आहेत. मीटर व तोटी बसविणे कामे पूर्ण झाल्याची पाहणी राज्य पाणी पुरवठा मंडळ करेल. शहरातील अनधिकृत बांधकामे व ले-आऊट रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस उपनगराध्यक्ष अजित करजगी, कर्नाटक राज्य पाणीपुरवठा अभियंता चंद्राप्पा शिरूर, सुरेश नामगथु यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.