कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोप म्हणजे समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे चारित्र्यहनन करून त्याला मानसिकदृष्टया दुबळे करण्याचा भाजप सरकारचा आधुनिक फंडाच आहे, अशी प्रतिक्रिया कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
घाटगे म्हणाले, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ हे तळागाळातील माणसाची प्रगती व्हावी, त्यांचे दु:ख, दारिद्र्य नष्ट व्हावे, यासाठी गेल्या तीन दशकांपासून अविश्रांतपणे कार्यरत आहेत. त्यांच्यावरील आरोप अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहेत. हे आरोप अदखलपात्रच आहेत. त्यातून खचून न जाता अव्याहतपणे सुरू असणाऱ्या कार्यात मुश्रीफ यांनी कार्यमग्न राहावे.
घाटगे म्हणाले, अल्पसंख्याक समाजातील असतानाही मुश्रीफ हे आपल्या उत्तुंग कार्याच्या जोरावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. परंतु, समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे चारित्र्यहनन करून त्याला मानसिकदृष्टया दुबळे करण्याचा हा आधुनिक फंडाच आहे. समाजातील दीनदलित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, निराधार व्यक्तिला आधार देण्यासाठी संवेदना कायम राखून काम करणारे नेते आहेत. त्यामुळे जनताही मुश्रीफ यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी असून, लोकसेवेच्या जोरावरच त्यांनी सलग पाच वेळा विजय संपादन केला आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा लोकप्रिय लोकप्रतिनिधींवर नाहक आरोप करून त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करणे ही लोकहिताला बाधा आणणारी बाब आहे.
बेरजेचे राजकारण...
कागलच्या राजकारणात संजयबाबा घाटगे हे मुश्रीफ यांचे पारंपरिक कट्टर राजकीय विरोधक मानले जात होते. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुश्रीफ-घाटगे या नेत्यांत मनोमीलन झाले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून मुश्रीफ यांनी हे बेरजेचे राजकारण केले आहे. सध्या कागलच्या राजकारणात मुश्रीफ, संजयबाबा घाटगे आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे तिन्ही गट एका बाजुला आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे हे त्यांच्या विरोधात अशी राजकीय स्थिती आहे.