सांगली/मिरज : शहर व परिसरात शुक्रवारी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले.सकाळी साडेआठ वाजता सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर खुदबा पठण झाले. विविध मशिदीमधून आलेल्या मौलाना यांनी संदेशाचे वाचन केले. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, नगरसेवक संजय बजाज, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक, मदनभाऊ युवा मंचचे सतीश साखळकर आदींनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्या दिल्या. यावेळी ईदगाह कमिटीचे अध्यक्ष हारुण शिकलगार, सचिव मुन्ना कुरणे, असीफ बावा, निसार संगतरास, महम्मदअली बागवान, फिरोज महात, ताजुद्दीन शेख, इरफान शिकलगार, अस्लम बागवान आदी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ईदगाह मैदान परिसरसह शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरज शहर व परिसरात शुक्रवारी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध मशिदीत ईदनिमित्त विशेष नमाज पठण झाले. ईदगाह मैदानावर सकाळी सामुदायिक नमाज पठण झाले. मौलाना महंमदगौस कादरी यांनी नमाज पठण व मौलाना महंमदगौस खतीब यांनी खुदबा पठण केले. नमाज पठणानंतर पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, माजी आमदार हाफिज धत्तुरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, गजेंद्र कुल्लोळी, अय्याज नायकवडी, राजू सर्वदे, राकेश कोळेकर, महेश भोसले, शकिल पटेल, विष्णुपंत गवंडी यांच्यासह सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहर व परिसरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. (वार्ताहर)गोटखिंडीत कुर्बानीविना बकरी ईद गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे मशिदीत गणपतीच्या स्थापनेची गेल्या ३५ वर्षांची परंपरा आजही कायम आहे. यावर्षी गणेशोत्सव काळातच बकरी ईद आल्याने या सणाला ‘कुर्बानी’ न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता. त्यामुळे शुक्रवारी बकरी ईद हा सण फक्त नमाज पठण करून कुर्बानीविना साजरा झाला. येथे हिंदू-मुस्लिम या दोन्ही समाजामध्ये सलोख्याचे संबंध आहेत. एकमेकांच्या सणांना किंवा घरगुती कार्यक्रमांमध्ये सर्वांची उपस्थिती असते. त्यातून एकोपा निर्माण झाला आहे. येथील झुंझार चौकात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक नजरेस येते. गेल्या ३५ वर्षांपासून मशिदीमध्ये गणपती बसविण्याची परंपरा दोन्ही समाजाकडून स्वागतार्ह असते. येथील गणेश मंडळांमध्ये मुस्लिम समाजातील कार्यकर्ते सहभागी होत असतात. गणपतीच्या आरतीला नेहमीच मुस्लिम बांधव उपस्थित असतात. तसेच मुस्लिम बांधवांच्या सणांवेळी शुभेच्छा देण्यास व त्यांच्या सणांचा प्रसाद घेण्यासाठी हिंदू बांधव आवर्जून उपस्थित असतात.
सांगली, मिरजेत सामुदायिक नमाज पठण
By admin | Updated: September 26, 2015 00:16 IST