कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याच्या न्यायालयीन कोठडीत पंधरा दिवसांची वाढ करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुनीलजित पाटील यांनी हे आदेश शनिवारी दिले. दरम्यान, शनिवारची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार होती; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे न्यायालय व कारागृह प्रशासनाचा संवाद होऊ न शकल्याने समीरच्या गैरहजेरीत सुनावणी झाली. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग चाचणी करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांनी सादर केला होता. त्यावर न्यायमूर्ती डांगे यांनी संशयित आरोपीला ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी संमती विचारली असता त्याने त्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांचा अर्ज फेटाळून गायकवाड याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यापूर्वीची सुनावणी समीरच्या गैरहजेरीत झाली. त्यामुळे शनिवारच्या सुनावणीसाठी त्याला न्यायालयात हजर करण्याची दाट शक्यता होती. सुरक्षेच्यादृष्टीने पुरेसा पोलीस फौजफाटा उपलब्ध नसल्याने थेट कारागृह ते न्यायालय, अशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीचा निर्णय झाला. त्यानुसार दुपारी अडीचच्या सुमारास आरोपीचे वकील एम. एम. सुहासे, समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर तसेच सरकारी वकील चंद्रकांत बुधले, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक माधव पडिले, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख न्यायालयात आले. साडेचारच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला सुरुवात झाली. कारागृहातून समीर थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायाधीशांशी संपर्क साधणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे दोन्ही बाजूंचा संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली नाही. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी संशयित आरोपीच्या कोठडीत वाढ करावी, अशी विनंती यावेळी केली. त्यावर न्या. पाटील यांनी २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीचे आदेश दिले. समीरला काही सांगायचे आहे समीर गायकवाड याची कळंबा कारागृहात त्याचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सकाळी भेट घेतली. यावेळी समीरने तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याला न्यायालयाला लेखी पत्र द्यायचे आहे. किंवा न्यायालयात स्वत: हजर राहून सांगायचे आहे. त्यामुळे त्याला आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करावे, असा अर्ज अॅड. इचलकरंजीकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांना दिला. त्यावर न्या. डांगे यांनी १७ नोव्हेंबर ही सुनावणीची तारीख देत सरकारी वकिलांनी म्हणणे सादर करावे. त्यानंतर या अर्जावर निकाल दिला जाईल, असे सांगितले. त्यानुसार सरकारी वकील आपले म्हणणे सादर करणार आहेत.
समीरच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: November 8, 2015 00:35 IST