कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील विजयाचा गुलाल उधळणार की अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिक विजयाचा दावा खरा करणार, ही एकच चर्चा सोमवारी दिवसभर जिल्ह्यात सुरू होती. दोन्ही गटांचे कार्यकर्ते मात्र ‘गॅस’वर आहेत. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांना मिळाल्यानंतर महादेवराव महाडिक यांनी बंडखोरी करीत रिंगणात अपक्ष म्हणून शड्डू ठोकला. महाडिक हे अठरा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने ही निवडणूक पाटील यांच्यादृष्टीने तशी सोपी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाने पाटील यांना पाठबळ दिल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली. आपल्याकडील मतदारांचे दावे-प्रतिदावे झाले, प्रत्यक्षात मतदानही झाले, तरीही भल्या-भल्यांना या निवडणुकीचा अंदाज बांधता आलेला नाही. दोन्ही गटांकडून ‘साम, दाम, दंड’ सर्व नीतीचा त्याच ताकदीने वापर केल्याने निकालापर्यंत दोन्ही गटांचे कार्यकर्ते ‘गॅस’वर आहेत. रविवारी मतदानावेळी सतेज पाटील यांनी २५० मतांचा दावा करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले, तर बुधवारी मतमोजणीला गुलाल घेऊनच येणार, असा दावा महादेवराव महाडिक यांनी केल्याने निकालाबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभर कोण विजयी होणार याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. काही जाणकार मंडळी तालुकानिहाय आकड्यांचे गणित मांडून सतेज पाटील यांचा गुलाल निश्चित सांगत होते, तर काहीजण ‘आप्पाच शिट्टी वाजविणार,’ असे ठामपणे सांगत होते. संपूर्ण दिवसभर सोशल मीडियासह सर्वच माध्यमांतून विधान परिषद निकालाचीच चर्चा सुरू होती. उद्या अकरापर्यंत गुलालकोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीचा गुलाल बुधवारी (दि. ३०) सकाळी अकरापर्यंत उधळला जाणार आहे. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यात शांततेत १०० टक्के मतदान झाले आहे. मतपेट्या शासकीय तंत्रनिकेतन, माहिती व तंत्रज्ञान इमारत, कोल्हापूर येथील स्ट्राँगरूम येथे बंदोबस्तात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सैनी म्हणाले, मतमोजणी तीन टेबलांवर होणार असून, प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि दोन मतमोजणी सहायक अशा एकूण नऊ व राखीव तीन अशा एकूण बाराजणांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, कामकाजासाठी ३१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये पोलीस उपअधीक्षक एक, पोलीस निरीक्षक आठ, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अकरा, दोन स्ट्रायकिंग फोर्स असा फौजफाटा राहील. याशिवाय मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूमभोवती पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व चार गार्ड असा बंदोबस्त तीन शिफ्टमध्ये ठेवला आहे.
जिल्ह्यात एकच चर्चा
By admin | Updated: December 29, 2015 00:45 IST