कोल्हापूर : राज्यसभेचे नूतन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा आज, सोमवारी अलाहाबाद येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे संभाजीराजे यांना घेऊन सकाळी ७ वाजता पुण्यातून खास विमानाने या सत्कारासाठी जाणार आहेत.संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून शनिवारी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली. अशा पद्धतीने नियुक्ती होणारे ते कोल्हापुरातील पहिलेच खासदार आहेत. रविवारी त्यांचा कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन गौरव केला. भाजपच्या वरिष्ठ स्तरावरही त्यांचा गौरव होणार आहे. अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्री व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (प्रतिनिधी)अन् संभाजीराजेंना अश्रू अनावर... कोल्हापूर : राष्ट्रपती कोट्यातून खासदारपदी नियुक्ती झालेल्या युवराज संभाजीराजे छत्रपती यांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी जिल्ह्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी न्यू पॅलेसवर अलोट गर्दी केली होती. सुमारे पाच तास शुभेच्छुकांची गर्दी होती. ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘खासदार संभाजीराजेंचा विजय असो’ अशा जयघोषांनी पॅलेस परिसर दुमदुमला. फटाक्याच्या आतषबाजीने न्यू पॅलेसवर जणू दिवाळीच साजरी झाली.न्यू पॅलेसवर औक्षण केल्यानंतर युवराज संभाजीराजे यांनी पिता श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांना मुजरा करताना संभाजीराजे यांना आनंदाच्या भरात अश्रू अनावर झाले. त्याचवेळी शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांना आपल्या छातीवर डोके ठेवून सावरले. ते म्हणाले, ‘बराच काळ सोसलासा. आता चांगले दिवस आलेत.’ न्यू पॅलेसच्या दरबारात झालेल्या या भावपूर्ण वातावरणामुळे उपस्थित सारेच गहिवरले. -वृत्त/४
संभाजीराजेंचा आज मोदींच्या हस्ते सत्कार
By admin | Updated: June 13, 2016 00:47 IST