कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांनी श्रद्धेने वाहिलेल्या गेल्या १० वर्षांपासूनच्या १५ हजारावर साड्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे तशाच आहेत. यापैकी चांगल्या साड्यांची उद्या शनिवारपासून त्र्यंबोली टेकडीवरील कार्यालयात विक्री सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील एक असलेल्या श्री अंबाबाईच्या दर्शनाला येताना भाविक साडी, खणा- नारळाची ओटी देवीला वाहतात. अशा हजारो साड्या दरवर्षी देवस्थान समिती व पुजाऱ्यांकडे येतात. सध्या मंदिर बंद असले, तरी साड्या वाहिल्या जातात, त्यांचे प्रमाण कमी झाले एवढेच. वर्षानुवर्षे देवीला आलेल्या या साड्या देवस्थान समितीकडे तशाच घडीदेखील न मोडता ठेवलेल्या आहेत. या साड्या भाविकांना प्रसाद म्हणून विकण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.
---
भाविकांना साडीच्या ६० टक्के रक्कम भरून ती खरेदी करता येईल. सकाळी ८ ते १ व दुपारी २ ते ५ या दोन सत्रात त्यांची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून कुपन दिले जाईल. दिवसाला फक्त २०० कुपन्स दिली जातील. एका व्यक्तीला ५ पेक्षा जास्त साड्या खरेदी करता येणार नाही. प्रक्रिया अधिक पारदर्शी व्हावी, यासाठी आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक घेतले जातील.
--
ठोक विक्री नाकारली
मंदिर परिसरातील व्यापारी या अर्पण झालेल्या साड्या एकदम खरेदी करून पुन्हा भाविकांना विकतात. साड्या विक्रीचा निर्णय झाल्यानंतर अनेकजणांनी एकदम ५ हजार साड्या घेतो, असा प्रस्ताव समितीपुढे ठेवला होता. मात्र तो नाकारत समितीने साड्यांचे दालन भाविकांसाठी खुले केले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा डाव फसला आहे.
--
२ हजार साड्या खराब
यापैकी २ हजार साड्या वर्षानुवर्षे घडी न मोडल्याने, तुकडे पडल्याने तसेच वापरानविना राहिल्याने खराब झाल्या आहेत. त्या बाजूला काढून ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचे काय करायचे, याचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.