लोकमत न्यूज नेटवर्क
दत्तवाड : ‘गाव करील ते राव काय करील’ याचे उत्तम उदाहरण सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थांनी समाजासमोर घालून दिले. येथील पांडुरंग प्रकाश पाटील या तरुणाला ब्लड कॅन्सर आजाराने ग्रासले. त्याच्या मदतीसाठी पूर्ण गावाने मदतीचा विडा उचलून इतर गावांसमोर नवा आदर्श निर्माण करुन माणुसकीचे दर्शन घडवले.
येथील पांडुरंग पाटील हा सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न बाळगून सराव करत होता. परंतु, नशिबाची साथ त्याला मिळाली नाही. अचानक प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. यावेळी ब्लड कॅन्सर या रोगाचे निदान झाले. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असून, तो सध्या कोल्हापूर येथील स्टार मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात उपचार घेत आहे. येथील उपचारांचा खर्च साधारणत: दहा ते अकरा लाखांच्या आसपास असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
इतका मोठा खर्च या कुटुंबाला पेलवणारा नाही, हे लक्षात आल्यानंतर गावातील काही सुज्ञ तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटून समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सेवा संस्था, शाळा, महाविद्यालये यांना मदतीची हाक दिली. याला त्वरित प्रतिसाद देत गावातील व गावाबाहेरील ग्रामस्थांनी थेट त्याच्या बँक खात्यात मदत करण्यास सुरुवात केली. अगदी दक्षिण आफ्रिका, नायजेरिया येथे वास्तव्याला असणारे गावातील ग्रामस्थही मदतीसाठी धावून आले. त्यांनीही याची दखल घेऊन पांडुरंगला आर्थिक मदत केली. अवघ्या तीनच दिवसात अडीच ते तीन लाखांपेक्षाही जास्त आर्थिक मदत जमा झाल्याचे समजते.
पांडुरंगला रक्ताचीही आवश्यकता असल्याने येथील तरुणांनी त्याची पूर्तता करण्यासाठी गावामध्ये रक्तदान शिबिर घेतले. या उपक्रमालाही तरुणांनी भरघोस प्रतिसाद देत विक्रमी दात्यांनी रक्तदान केले. रक्तपेढी संस्थेच्या बॅगा संपल्या, परंतु रक्तदात्यांची रांग काही संपली नाही. गावात एखाद्या कुटुंबावर अशाप्रकारचे संकट ओढवल्यास माणुसकीचे दर्शन घडवून तन-मन-धनाने जितकी मदत करता येईल तितकी मदत आपापल्यापरीने कोणतीही जात-पात न पाहता एकजुटीने येथील ग्रामस्थ करतात, याचे उत्तम उदाहरण त्यांनी जगाला दाखवून दिले आहे.