वडणगे : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील च्यवनऋषी यात्रेनिमित्त एस. आर. पाटील ग्रुपच्यावतीने झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत पन्हाळा तालुक्यातील देवठाणेच्या संग्राम पाटीलने अकलूजच्या सचिन केचेला आठव्या मिनिटाला नवदर घिस्सा डावावर चितपट करीत विजय मिळविला. मैदानात लहान-मोठ्या शंभरांवर चटकदार कुस्त्या झाल्या.सुरुवातीस दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत आक्रमकता घेतली. अखेर संग्राम पाटीलने सचिन केचेवर चढाई करून खाली घेत नवदर घिस्सा डावावर त्याला अस्मान दाखविला. दोन नंबरच्या लढतीत आमशीच्या सरदार सावंतने अकलूजच्याच निवास मसुगडेवर नवव्या मिनिटास धक्का घिस्सा डावावर नेत्रदीपक विजय प्राप्त केला. तीन व चार नंबरच्या कुस्त्या सुमारे ३० मिनिटांच्या लढतीनंतर बरोबरीत सोडविण्यात आल्या.आखाडा पूजन पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पांडुरंग पाटील, वाहतूक निरीक्षक सागर चौगले व गणेश वरुटे यांच्या हस्ते झाले. विजेत्या मल्लांना आय. आर. एस. अधिकारी महेश पाटील, ए. पी. आय. रघुनाथ कळके, पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे, जि. प. चे सदस्य एस. आर. पाटील, आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली.मैदानातील अन्य विजयी मल्ल असे- दिनकर गोऱ्हे (न्यू मोतीबाग), तानाजी कुऱ्हाडे (शाहू साखर), अमर गाडवे (न्यू मोतीबाग), ऋषिकेश माने (वडणगे), सोनू राऊत (न्यू मोतीबाग), पृथ्वीराज पाटील (देवठाणे), अनिकेत पाटील (आमशी), प्रथमेश पाटील (म्हारूळ).पंच म्हणून बाळासो पाटील, बाजीराव पाटील, आप्पा निकम, विलास टिपुगडे, बाबासो पाटील, कुंडलिक किडगावकर, तर समालोचक म्हणून कृष्णात चौगले (राशिवडे) व अरुण मांगलेकर यांनी काम पाहिले.
संग्राम पाटीलकडून सचिन केचे चितपट
By admin | Updated: March 18, 2016 00:54 IST