कोल्हापूर : ‘आपले मत, आपली ताकद’, ‘मतदान करूया, लोकशाही जागवूया’, ‘कोल्हापूरची शान १०० टक्के मतदान’ अशा घोषणा देत आज, रविवारी कोल्हापूरकर शहरातील मुख्य रस्त्यांवरून धावले, निमित्त होते. मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित ‘रन फॉर व्होट’ रॅलीचे, दसरा चौक येथे रॅलीचे उद्घाटन मतदान जनजागृती निरीक्षक रत्नप्रकाश यांच्या हस्ते झाले. निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, याकरिता निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने आज सकाळी ‘रन फॉर व्होट’चे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौक येथे रॅलीचे उद्घाटन झाल्यानंतर घोषणा देत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करीत भवानी मंडप येथे रॅली सांगता झाली. या ठिकाणी उपस्थितांना मतदान पवित्र हक्क बजाविण्याची शपथ देण्यात आली. या रॅलीचे नियोजन मेजर प्रा. रूपा शहा यांनी केले होते. संगीता चौगले, प्रशांत पाटील, किरण कुलकर्णी, विजय खोराटे, अश्विनी वाघमळे, शीला पाटील, उमेश रणदिवे, नेत्रदीप सरनोबत, महापालिकेचे कर्मचारी, पदाधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक, सरकारी, निमसरकारी कर्मचारी, संस्थांचे पदाधिकारी, आदी सहभागी होते. अशी घेतली शपथ..आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकींचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.
‘रन फॉर व्होट...’
By admin | Updated: October 13, 2014 00:48 IST