कोल्हापूर : ‘कापला रे कापला...’, ‘धावा...’ ‘पकडा...’ अशा आरोळ्यांत पतंग उडविण्याचा व काटाकाटींच्या स्पर्धेत पतंग कटविण्याचा आनंद २००हून अधिक बालक व पालकांनी आज, रविवारी सायंकाळी तपोवन येथील मोकळ्या मैदानात घेतला.कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन व केमिस्ट क्लब यांच्यावतीने पतंग उडविण्याचा महोत्सव केमिस्ट असोसिएशनच्या परिवारासाठी घेण्यात आला. या पतंग महोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक बालक-पालकांनी गर्दी केली होती. पाल्यांना पतंग उडविण्याची गोडी लागावी तसेच पतंग हा खेळ असून, तो उडविण्याचा आनंद मोकळ्या मैदानात घ्यावा, याकरिता जिल्हा केमिस्ट असोसिएशनने पुढाकार घेऊन आपल्या सभासदांच्या पाल्यांना जुन्या खेळाची गोडी लागावी, याकरिता तपोवन मैदान येथे आज या पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यामध्ये लहान मुलांसह पालकही अगदी त्यांच्याबरोबर पतंगाची काटाकाटी स्पर्धा करण्यात मग्न होते. एक पतंग जरी समोरील प्रतिस्पर्ध्याचा कटला तर पालकही त्या पतंगापाठीमागे ‘कापला रे कापला...’ करीत तो पतंग पकडण्यासाठी धावताना दिसत होते. या पतंग महोत्सवात बालक व पालकांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. या महोत्सवाचे उद्घाटन बाबा महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष व एम.एस.सी.डी.ए.चे सहसचिव मदन पाटील, उपाध्यक्ष सुधीर खराडे, सहसचिव संजय शेटे, खजानीस शिवाजी ढेंगे, भुजिंगराव मोहिते, केमिस्ट क्लबचे अध्यक्ष दाजीबा पाटील, सचिव संजय पाटील, संघटन सचिव जयंतराव रोडे, सचिन पुरोहित, भगवान किडगावकर, रशीद पठाण, धवल भरवडा, आदी केमिस्ट उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धावा...पकडा...कापला रे कापला...!
By admin | Updated: November 10, 2014 00:43 IST