अशोक पाटील - इस्लामपूर -‘एक गाव बारा भानगडी’, अशी स्थिती सध्या इस्लामपूर शहराची झाली आहे. सत्तेच्या खुर्चीमागील भानगडी चव्हाट्यावर आणण्याची जबाबदारी असलेल्या विरोधकांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे शहराचा विकास होण्याऐवजी शहराच्या बकालपणातच दिवसेंदिवस वाढ होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या भानगडी ‘मॅनेज’ करुन विरोधक गलेलठ्ठ झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे.शहराच्या १९८0 च्या विकास आराखड्यानंतर पालिकेने दोन वेळा नियोजित विकास आराखडा प्रस्तावित केला. या विकास आराखड्याच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांतील काही महाभागांनी लाखो रुपयांचा मलिदा जमा केला. तसेच स्वत:च्या भूखंडातील अडथळे सर्वसामान्यांच्या माथी मारुन आपले भूखंड सुरक्षित करुन ठेवले आहेत.बेघर वसाहतीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वेठीस धरले आहे. त्यांना देण्यात आलेली घरे ही निकृष्ट दर्जाची आहेत. महादेवनगर परिसरातील बांधलेली घरे केव्हा उद्ध्वस्त होतील हे सांगता येत नाही. येथील घरांचे वाटप झाले असले तरी, केवळ २ ते ४ कुटुंबेच वास्तव्यास आहेत. वीज व पाण्याची व्यवस्था नसल्याने येथे राहण्यास कोणीही धजावत नाही.अशा परिस्थितीत कापूसखेड रस्त्याजवळील स्मशानभूमीलगत बांधलेल्या नवीन घरकुलांची दफनभूमी कधी होईल हे सांगता येत नाही. यशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. तसेच विरोधी भाजपचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी यांनी विद्यमान नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी केलेल्या भानगडी बाहेर काढल्या असून त्यांनी त्यासाठी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यास पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु जुन्याच रस्त्यांना खोदून त्यांचे पॅचवर्क करण्याचा उद्योग सुरु आहे. याकडे विरोधकांचे दुर्लक्ष आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या स्वप्नातील रस्ते सत्यात कधी उतरणार, याचे उत्तर मात्र भाबड्या जनतेला मिळत नाही. रस्त्यावरील एल. ई. डी. दिव्यांच्या हजेरीतही जनतेला अंधारात चाचपडत जावे लागत आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचे नाटक सुरु केले आहे. यामध्ये विरोधकांना टिपून त्यांचीच अतिक्रमणे काढायची आणि संबंधित समर्थकांना बगल देण्याचा उद्योग होत असल्याने ही अतिक्रमणे काढण्याची मोहीम वादग्रस्त ठरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे तीनतेरा वाजले आहेत. याला कारणीभूत दलित संघटनेचे नेते आहेत. दलितांमध्ये नेता कोण? हेच कोडे सुटत नसल्याने सत्ताधाऱ्यांनी या पुतळ्याच्या सुशोभिकरणातील रकमेवर हात मारण्याचा उद्योग सुरु झाला आहे. त्यामुळे या कामातील ठेकेदार हैराण झाला असून त्याला लुबाडण्याचे उद्योग सुरू असल्याची चर्चा आहे. बाजारादिवशी शहरात वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत दखल घेतली जात नाही. एखाद्याचा जीव गेल्यांतरच हा प्रश्न सुटणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.विरोधक खंबीरपणे आपली भूमिका बजावत आहेत. एखादा विरोधक सत्ताधाऱ्यांना मॅनेज झाला असेल असे वाटत नाही. परंतु गेली २५ वर्षे सत्ताधारी सत्तेत असल्यामुळे विरोधकांच्या तक्रारीची दखल न घेता मनमानी पध्दतीने कारभार करत आहेत. राज्यात सत्ता असल्यामुळे प्रशासनावर दबाव टाकून अनेक प्रकरणे दाबण्यात आली आहेत. आता केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे विक्रम पाटील यांना सोबत घेऊन आम्ही सर्व बेकायदेशीर कामांचा पर्दाफाश करणार आहोत. आम्ही सर्व विरोधक एकच आहोत, त्याचा प्रत्यय काही काळात येईल.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते, इ. न. पा.
सत्ताधारी भ्रष्टाचारी अन् विरोधकही खवय्ये
By admin | Updated: December 14, 2014 23:44 IST