इचलकरंजी : शहापूर येथे होणाऱ्या आरटीओ कँपमध्ये वाहन परवाना काढणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या लालफितीचा फटका बसत असल्याने आज, मंगळवारी संतप्त झालेल्या वाहनधारकांनी, तसेच मोटार ट्रेनिंग स्कूलचालक व एजंटस्नी कँपचे कामकाज बंद पाडले. यावेळी कागदपत्रांसाठी नाहक त्रास दिला जात असल्याबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. दरम्यान, आंदोलनस्थळी आलेले माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी अधिकाऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांसाठी त्रास न देता वाहन परवाने सत्वर देण्याबाबत सूचित केले.दर मंगळवारी आणि बुधवारी शहापूर येथे वाहन परवाना कँपचे आयोजन करण्यात येते. या कँपमध्ये शिकाऊ वाहनधारकांना गत तीन-चार महिन्यांपासून वेळेत परवाने मिळालेले नाहीत. अनेकवेळा कार्यालयाकडून कागदपत्रे गहाळ होण्याचा प्रकार घडल्याने परवान्यासाठी वाहनधारकांना पुन्हा हेलपाटे मारावे लागले. कँपच्या ठिकाणी परवाने देताना भेदभाव केला जातो. तसेच अंतिम परवाना दोन महिन्यांत मिळणे अपेक्षित असताना त्याची अंमलबजावणी केली जात नाही. या गैरसोयीबाबत इचलकरंजी मोटार ट्रेनिंग स्कूल आणि एजंटांनी अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज, मंगळवारी वाहनधारकांसह ट्रेनिंग स्कूलचालक व एजंटांनी कँपचे कामकाज बंद पाडले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी निदर्शनेही केली.मोटार ट्रेनिंग स्कूलच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन वाहन परवानाधारकांच्या होत असलेल्या गैरसोयीची माहिती दिल्यानंतर आवाडे आंदोलनस्थळी आले. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वाहनधारकांना त्रास न देता वाहन परवाना त्वरित देण्याबाबत सूचना केली. (प्रतिनिधी)
आरटीओ कँ प बंद पाडला
By admin | Updated: August 12, 2014 23:20 IST