कोल्हापूर : शुक्रवारी सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे आगमन होत आहे. शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, कुंभार गल्ली, बापट कॅम्प या ठिकाणांहून गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दी होते. गणेशमूर्ती आगमन सुरळीत व सुरक्षित पार पाडण्याकरिता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्या परिसराकडे येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जाहीरनाम्याद्वारे दिली आहे.
या सर्व कुंभार गल्लीत वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून, परिसरातील मैदानावर वाहने पार्किंग व्यवस्था केली आहे. शाहूपुरी गवत मंडईत ५० मीटरपर्यंत नो पार्किंग केले आहे. पापाची तिकटी परिसरात प्रमुख मार्गावर वाहने थांबविण्यास मनाई आहे. परिसरात पार्किंग सोयीनुसार जागा उपलबध करून देण्यात येणार आहे. शिरोली टोल नाका ते बापट कॅम्पकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना शिरोली टोल नाका येथे प्रवेश बंद करून ती वाहने मार्केट यार्ड चौक येथून जाधववाडीमार्गे पुढे मार्गस्थ केली जातील.