इचलकरंजी : येथील महापुराचे पाणी संथगतीने कमी होत असून, मरगुबाई मंदिर ते पंचगंगा पूल या मार्गावर पाच ते सहा ठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच इचलकरंजी-शिरदवाड मार्ग सुरू झाला आहे. इचलकरंजी-हुपरी मार्गावर पाच ते सहा फूट पाणी असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. महापुरामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली होती. तेथील नागरिकांना पालिकेने स्थलांतरित केले असून, महापुराचे पाणी संथगतीने कमी होत आहे. इचलकरंजीत पंचगंगा नदीची पातळी ६९.३ फुटांवर आली असून, पाणी ओसरू लागलेल्या भागात नागरिक परतू लागले आहेत. तसेच नदीवेसकडे जाणाऱ्या काही सखल भागांमध्ये १ ते दीड फूट पाणी असल्याने वाहनधारकांना यातून मार्ग काढताना अडथळा निर्माण होत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पालिकेने मरगुबाई मंदिर ते पंचगंगा नदी मार्गावर रस्ता डांबरीकरण केला होता. परंतु महापुराच्या पाण्याने रस्ता उखडल्याने त्याचा दर्जा कमी असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. हा रस्ता खचला असून, वाहनधारकांनी जपून जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो ओळी
३००७२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजी मरगुबाई मंदिर ते नदीवेस या मार्गावर महापुराच्या पाण्यामुळे पाच ते सहा ठिकाणी रस्ता उखडला आहे.