कबनूर : येथील ग्रामपंचायतीने एका फोन कंपनीकडून सुमारे १३ लाख रुपये डिपॉझिट भरुन घेऊन त्यांना केबल टाकण्यासाठी आझाद नगरमधील रस्ता खुदाईस परवानगी दिली होती. केबल टाकून महिना झाला तरी ग्रामपंचायतीने सदर रकमेतून रस्ता पूर्ववत केला नाही. त्यामुळे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी सदर रकमेचा अपहार केला असून त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपाईचे प. महाराष्ट्र माजी उपाध्यक्ष प्रा. अशोक कांबळे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, फोन कंपनीने दोन्ही बाजूने रस्ता खुदाई केली आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडचणीचे झाले आहे. त्यामुळे दोन नागरिक जखमी झाले आहेत. मुळातच हा रस्ता अरुंद असताना ग्रामपंचायतीने नागरिकांच्या हिताचा विचार न करता केवळ आर्थिक ढपला पाडण्यासाठी हा उद्योग केला आहे. हे पैसे गेले कोठे, याची चौकशी करावी व आठवड्याभरात रस्ता करावा ; अन्यथा घेराव घालू, असा इशारा देण्यात आला.