इचलकरंजी : शासनाने कंत्राटी पद्धतीने माध्यमिक व खासगी शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून, तो मागे घ्यावा व नोकरभरती अनुकंपा तत्त्वावर करावी, अशी मागणी येथील माध्यमिक खासगी शाळा व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या आयोजित चर्चासत्रात करण्यात आली.
येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये शासनाने घेतलेल्या नोकरभरतीबाबत चर्चासत्र व नूतन सदस्यांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक अशोक खोत यांनी केले.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती कंत्राटी पद्धतीने न करता चिपळूणकर समितीच्या शिफारशीनुसार व्हावी. तसेच अनुकंपा तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बालन पोवार, गौतम कांबळे, कपिल पवार, अनिल कोळी, विठ्ठल जावळे, सर्जेराव शिंदे उपस्थित होते.