सांगली : जिल्ह्यातील एका प्रमुख लोकप्रतिनिधीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दूरध्वनीवरुन अरेरावीची भाषा वापरल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी महसूल कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर काळ्या फिती लावून काम केले. दरम्यान, शिंदे यांनी हे आंदोलन प्रतिकात्मक असल्याचे सांगितले. शनिवार दि. ७ मार्च रोजी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना काही कामासंदर्भात एका लोकप्रतिनिधीने दूरध्वनीवरुन अरेरावीची भाषा वापरली होती. त्याचवेळी शिंदे यांनी, ‘तुम्ही या भाषेत बोलणार असाल तर मी पुन्हा तुमचा दूरध्वनी घेणार नसल्याचे’ सांगितले होते आणि तात्काळ दूरध्वनी बंद केला होता. यावेळी शिंदे यांच्या कार्यालयात एक आमदार उपस्थित असल्याचे समजते. ही वार्ता महसूल कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी आज, सोमवारी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला. नूतन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आजच दुपारी पदभार हाती घेतला होता. त्यावेळी महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. त्यामुळे काहींचा गैरसमज झाला. याबाबत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना, हे प्रतिकात्मक आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात नसून या लोकप्रतिनिधींनी वापरलेल्या भाषेच्या विरोधात आहे. तसेच या आंदोलनाची पूर्वकल्पना नूतन जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचे सांगितले. आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू कदम, जावेद बोजगर, सुरेखा गोरे, शुभांगी सरवदे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधी कोण?निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दूरध्वनीवरुन कोणत्या लोकप्रतिनिधीने अरेरावीची भाषा वापरली, याची चर्चा आज दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होती. पत्रकारांनीही ‘ते लोकप्रतिनिधी कोण?’ असा प्रश्न विचारताच शिंदे यांनी नाव सांगण्याचे टाळले. मात्र कार्यालय परिसरात ते लोकप्रतिनिधी खा. संजय पाटील असल्याचीही चर्चा रंगली होती.
महसूल कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन
By admin | Updated: March 9, 2015 23:43 IST