कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाचा पोलीस तपास गतीने सुरू आहे. दरम्यान, छाप्यावेळी सापडलेल्या डायरीतील नावानुसार पोलिसांनी सोनोग्राफी मशीनवर तपासणी केलेल्या १६ महिलांना शोधून त्यांचे पोलीस ठाण्यात जबाब नोंदवले, त्यांच्याकडे तसेच संशयीत राणी कांबळे हिच्याकडे केलेल्या चौकशीतून काही एजंटाची नावे उघड झाली आहेत. त्यानुसार याप्रकरणी एजंटांची मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मंगळवारी अटक केलेली कथित डॉक्टर मुख्य सूत्रधार राणी मनोहर कांबळे हिला न्यायालयात हजर केले असता तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कांबळेसह एकूण सहा संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज, गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करुन तपासाच्या अनुषंगाने त्यांची पोलीस कोठडी वाढवून घेण्याची शक्यता आहे.
परिते येथे बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी एका घरावर रविवारी करवीर पोलिसांनी छापा टाकून संशयित बनावट डॉक्टर महेश पाटील, घरमालक साताप्पा खाडे, गर्भलिंग निदानासाठी आलेल्या महिलेचा पती अनिल माळी, एजंट भारत जाधव, एजंट सचिन घाटगे यांना अटक केली. तर पळून गेलेली राणी कांबळे हिला मंगळवारी अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत काही एजंटांची नावे उघडकीस आली आहेत. त्यामुळे याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेली एजंटांची मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता आहे.