कागल
: कागल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज, सोमवारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. येथील तहसील कार्यालयाजवळील शासकीय गोडावूनमध्ये वीस टेबलवर सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या फेरीत मेतगे, केंबळी, हळदी, गलगले, अर्जुनी, बेलवळे खुर्द, कासारी ही गावे आहेत. हा निकाल सकाळी साडेआठपर्यंत लागेल, तर नवव्या फेरीत व्हन्नूर व बिद्री ही गावे आहेत. त्यांचा निकाल दुपारी बारा वाजेपर्यंत लागेल.
पंधरा ते वीस मिनिटांत एका फेरीची मतमोजणी स्पष्ट होईल. मात्र, निकालानंतर दुसरी फेरी सुरू करण्यासाठी प्रतिनिधी प्रवेश आणि व्होटिंग मशीन मांडणी यात बराच वेळ जाणार असल्याने दुपारी बारा वाजतील. या निवडणुकीत प्रत्येक गावात विविध गट एकत्र आले आहेत. आपल्या सोयीच्या आघाड्या केल्या आहेत. त्यामुळे गटाची राजकीय ईर्षा कमी आणि वैयक्तिक हेवेदावे, भावकी तिढे जास्त टोकाचे बनले आहेत.
मिरवणूक काढण्यास मनाई
पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढता येणार नाही. मिरवणूक काढल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहन व्यवस्था
निढोरी -कागल मार्गावरून येणारी वाहने वड्डवाडी, गोसावी वसाहत या परिसरात लावावीत, तर सुळकूड, करनूर तसेच निपाणीकडून येणारी वाहने जयसिंगराव पार्ककडील बाजूला उभी करणेची आहेत. मात्र, महामार्गावर उत्साही समर्थक येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची गरज आहे.