कोल्हापूर : ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने आयोजित केलेली ‘सुंदर माझे अक्षर’ ही दोनदिवसीय हस्ताक्षर कार्यशाळा मोठ्या उत्साहात शुक्रवारी न्यू महाद्वार रोड येथील राम गणेश गडकरी हॉल येथे झाली. या कार्यशाळेत चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हस्ताक्षर सुधारण्याचे धडे गिरविले. जोडीला जादूगार गुरुदास यांचा ‘मॅजिक शो’ही झाला.अक्षर संस्कार इन्स्टिट्युट आॅफ हॅँडरायटिंग टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून गुरुवार (दि. १९) व शुक्रवारी या दोनदिवसीय हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कोल्हापुरातील सर्व शाळांतील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी हस्ताक्षरात सुधारणा होण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गुरुवारी दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या या कार्यशाळेत प्रथम हस्ताक्षर चांगले का असावे, याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच इंग्रजी अक्षरांची ओळख करून देत त्यांतील प्राथमिक अक्षरे कशी बनली, याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले; तर शुक्रवारी या कार्यशाळेत मराठीतील ‘अ’ ते ‘ज्ञ’पर्यंतची बाराखडीही वेगळ्या रीतीने मुलांकडून स्वच्छ हस्ताक्षरात गिरवून घेतली. याशिवाय इंग्रजी प्राथमिक शब्द अर्थात ‘ए’ ते ‘झेड’ ही मुळाक्षरेही मुलांकडून गिरवून घेण्यात आली. दोन दिवस झालेल्या या कार्यशाळेत पूजा डकरे, तेजश्री पाटील, मारुती पाटील, अनिकेत साळोखे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा शुक्रवारी समारोप झाला. कार्यशाळेच्या प्रारंभी जादूगार गुरुदास यांचा ‘मॅजिक शो’ झाला. यामध्ये जादूने खाऊ काढून दाखविणे, पेटत्या ज्वालेतून चॉकलेट काढून दाखविणे, पाण्याच्या प्याल्यातून दूध दाखवून या मॅजिक शोसह लांबूनच दूध पिण्यास सांगून ते दूध संपत आल्याचे दाखवून देणे,आदी जादूचे प्रयोग जादूगार गुरुदास यांनी करून दाखवीत उपस्थित बालचमूंंना थक्क होण्यास भाग पाडले.
‘सुंदर माझे अक्षर’ कार्यशाळेला प्रतिसाद
By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST