कोल्हापूर : एखाद्या नागरिकाने टोल दिला नाही, तर ते गुन्ह्याचे कृत्य ठरत नाही म्हणूनच शहरात जर आयआरबी कंपनीने टोलवसुली सुरू केल्यास टोल देऊ नका. जर टोलसाठी कोणी अडवणूक केली, दांडगावा केला तर थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार द्या, असे आवाहन आज, शनिवारी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीतर्फे करण्यात आले. आयआरबी कंपनीने कोणत्याही क्षणी टोलवसुली सुरू करण्याची तयारी केली आहे. टोल विरोधी कृती समितीने आजही टोलला ठाम विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी कृती समितीने नागरिकांना कायदेशीर भाषा समजावी या हेतूने पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. अॅड. गोविंद पानसरे म्हणाले की, ‘टोल दिला नाही, तर तो गुन्हा ठरत नाही. कोणत्याही नागरिकाला मुक्तपणे फिरण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यामुळे कोणी टोलवसुलीसाठी नागरिकांच्या मुक्त फिरण्यात अडथळा आणत असेल, दांडगावा करीत असेल, बेकायदेशीर अटकाव करीत असेल तर तो दखलपात्र गुन्हा ठरतो. म्हणूनच टोलवसुलीचा कोणी आग्रह धरला तर तो देऊ नका. जर अधिकच बळजबरी केली जात असेल, तर संबंधित नागरिकाने पोलिसांकडे तक्रार द्यावी.’ कराराप्रमाणे रस्ते झाले की नाहीत, रस्त्यांचा दर्जा चांगला की खराब आहे, करारातील तरतुदींप्रमाणे कामे झाली आहेत की नाहीत या सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत, असे पानसरे यांनी सांगितले. टोल विरोधातील आंदोलन हे सर्वपक्षीय, सर्वव्यापी असे आहे. आतापर्यंत अनेक पातळीवर आंदोलने लढली जात आहेत. ज्यांना आंदोलनात भागीदारी करता आली नाही, अशांनी टोल न देता प्रवास करावा. टोलसाठी वाहन थांबविले तर टोल देणार नाही, असे सांगा, असे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी केले. पत्रकार परिषदेस रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार, नगरसेवक सत्यजित कदम, बाबा इंदुलकर, पंडितराव सडोलीकर, नारायण पोवार, बाबा पार्टे, सतीश कांबळे, रघुनाथ कांबळे, बाबा महाडिक, जयकुमार शिंदे, दीपा पाटील, वैशाली महाडिक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टोलसाठी दांडगावा केल्यास तक्रार द्या
By admin | Updated: June 15, 2014 01:48 IST