कोल्हापूर : महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना पदभार स्वीकारून चार वर्षे पूर्ण होत आहेत तरीही त्या खुर्चीवर आहेत. त्यांची बदली करा, अशी मागणी शासनाकडे करणार आहे, अशी माहिती महापालिक ा कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी आज, सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. उद्या, मंगळवारपासून संघाने पुकारलेला संप मागे घेत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. एका मिनिटात महापालिकेचे कामकाज बंद पाडू शकतो. मात्र, महापालिकेचे आर्थिक नुकसान नको, यासाठी तडजोड करत असल्याचे स्पष्टीकरणही देसाई यांनी यावेळी केले.न्यायालयाच्या दणक्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने १५३ कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची पत्रे दिली. मात्र, या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेने अद्याप कामावर घेतले नाही, तसेच यातील मृत २७ कर्मचाऱ्यांचे वारस व ११ कर्मचाऱ्यांना नेमणूकपत्रेच न मिळाल्याने त्यांचे भवितव्य काय, असा सवाल उपस्थित करत कर्मचारी संघाने उद्या, मंगळवारपासून बेमुदत संपाची नोटीस प्रशासनाला दिली होती.या पार्श्वभूमीवर आज अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ३ डिसेंबरला नेमणूकपत्रे दिलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर घेण्यात येईल तसेच मृत २७ कर्मचाऱ्यांच्या वारस व राहिलेल्या ११ कर्मचाऱ्यांना नेमणूकपत्रे देण्याबाबत आयुक्तांशी बैठक घेऊन पंधरा दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले. त्यानंतर संघटनेने प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत संप मागे घेतल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी) बिनकामाच्या अधिकाऱ्यांचा भरणामहापालिकेत एक आयुक्त व एक उपायुक्त असे दोन शासनाचे अधिकारी बस्स आहेत. मात्र, महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, सहाय्यक आयुक्त असा अधिकाऱ्यांचा भरणा आहे. हे सर्व अधिकारी बिनकामाचे आहेत. या सर्व अधिकाऱ्यांच्या पगाराचा भार महापालिकेने का सोसायचा, असा सवाल महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी केला.
आयुक्त बिदरी यांची बदली करा
By admin | Updated: December 9, 2014 00:25 IST