कोल्हापूर : रिक्षा व्यावसायिकांना खराब रस्त्यामुळे त्रास होत आहे. विशेषत: गंगावेश ते फुलेवाडी येथील रस्ता तातडीने करण्यात यावा, अशी मागणी शाहू रिक्षा मित्र मंडळाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, खराब रस्त्यांमुळे शहराची ओळख ‘खड्डेमय कोल्हापूर’ अशी होत आहे. बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. रिक्षा खड्ड्यात जात असल्यामुळे मणक्याला त्रास होत आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती आहे. रिक्षा चालविणे कठीण झाले असून गाडीच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. गंगावेश ते फुलेवाडी नाका या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रंकाळा वेश येथे तर रिक्षा कोणत्या बाजूने चालवावी, समोरून कोणती गाडी येते हे समजतच नाही. एक खड्डा चुकवल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात गाडी जाते. त्यामुळे येथील रस्ता प्राधान्याने करावा. यावेळी महादेव विभूते, संजय मोरे, कृष्णात कांबळे, पंडित पोवार, ईश्वर भादवणकर, आदी उपस्थित होते.