ज्योतीप्रसाद सावंत- आजरा --लोकवर्गणीअभावी रेंगाळलेल्या सोहाळे बंधाऱ्याची गळती काढण्यासह पाणी अडविण्याचे काम अखेर राजीव गांधी पाणी वापर संस्थेच्या पुढाकाराने मार्गी लागत असून, पुढच्या वर्षी पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होण्यासाठी बंधाऱ्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.जलसंधारण विभागाच्या अखत्यारित रामतीर्थ परिसरात हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या या बंधाऱ्याला गळत्या असल्याने व पाणी अडविण्याकरिता सडलेले लोखंडी बरगे वापरले जात होते. यामुळे सलग चार वर्षे जानेवारी महिन्यात बरग्यांना पाण्याचा दाब न पेलल्याने बरगे निसटून पाणी वाटून जाण्याचा प्रकार घडला. यामुळे या बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून असणारा व उन्हाळी पिके घेणारा शेतकरी वर्ग वारंवार अडचणीत आला आहे.राजीव गांधी पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून सदर बंधारा दुरूस्तीकरिता हालचाली सुरू होत्या; पण शेतकरी वर्गाकडून सुमारे ११ लाख रूपयांची लोकवर्गणी भरली जात नसल्याचे कारण पुढे करून जलसंधारण विभागाने बंधारा दुरूस्तीची वर्क आॅर्डर रद्दचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. सोहाळे, बाची, सोहाळेवाडी, साळगाव येथील ५५० शेतकऱ्यांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. बंधाऱ्याची दुरूस्ती सुरू झाल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.शेतकरी वर्गाने लोकवर्गणी भरण्यास हिरवा कंदील दाखविल्याने बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. बंधाऱ्याची गळती काढणे, पाणी अडविण्याकरिता नवीन बरगे वापरणे, इत्यादी कामे हाती घेण्यात आली आहेत. शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन सुरू आहे.बंधाऱ्यात पाणी नाहीसोहाळे बंधाऱ्यात पाणी साठविले गेल्याने याच नदीवर असणाऱ्या साळगाव व देवर्डे बंधाऱ्यात पुरेसे पाणी साठत असते. सोहाळे बंधाऱ्याला गळती लागल्याने साळगाव व देवर्डे हे दोन्ही बंधारे पाण्याअभावी उघडे दिसत आहेत.रामतीर्थ धबधबा बंदयावर्षी सोहाळे बंधाऱ्यात काहीच पाणी नसल्याने रामतीर्थ धबधबाही पूर्णपणे बंद झाला आहे.
सोहाळे बंधाऱ्याची डागडुजी युद्धपातळीवर
By admin | Updated: May 29, 2015 00:07 IST