समीर देशपांडे ल्ल कोल्हापूरजिल्ह्याच्या राजकारणातील अनेक मान्यवर नेते एकमेकांशी नात्यांमध्ये अडकले असल्याचे चित्र ठळकपणे समोर येत आहे. विशेष म्हणजे यातील अनेक हे परस्परविरोधी पक्षांमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये हे नातेसंबंध चर्चेला येत असतात. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही हे चित्र नक्कीच दिसून येईल. राज्याचाही विचार केला असता मोजक्या ५० घराण्यांकडे राज्याची सत्तास्थाने कशी एकवटली आहेत, याचा हिशेब मांडणारा संदेश व्हॉट्स अॅपवर गेली काही वर्षे फिरून जुना झाला आहे. मात्र राजकारणामध्ये एकमेकांची उणीदुणी काढणारी मंडळी असली तरी घरात सून आणताना, जावई निवडताना मात्र दक्ष असतात. बाकी सारं बाजूूला ठेवून मग एकमेकांशी नाती जोडली जातात.दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि दिवंगत आमदार नरसिंगराव पाटील हे व्याही. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांची बहीण ही नरसिंगरावांचे थोरले चिरंजीव राजेश यांच्या पत्नी आहेत. भाजपमध्ये असणारे गोपाळराव पाटील हे कॉँग्रेसमधील महेश आणि राजेश यांचे मामा. युतीच्या राज्यात मंत्री झालेले आणि सध्या कॉँंग्रेससोबत असणारे भरमूअण्णा पाटील यांचे चिरंजीव दीपक यांच्या पत्नी ज्योती या भुदरगड तालुक्यातील के. जी. नांदेकर यांच्या कन्या. राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे शिवसेनेत असलेले संग्रामसिंह कुपेकर हे पुतणे; तर त्यांचेच सख्खे भाऊ रामराजे यांना खासदार धनंजय महाडिक यांची बहीण दिली आहे. भुदरगडमधील माजी आमदार के. पी. पाटील यांची मुलगी ‘भोगावती’चे माजी चेअरमन धैर्यशील पाटील-कौलवकर यांची पत्नी; तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची बहीण ही के. पी. पाटील यांच्या पत्नी होत. ‘बिद्र्री’चे माजी व्हाइस चेअरमन गणपतराव फराकटे यांची मुलगी के. पीं.च्या मुलाला दिली आहे; तर कागलमधील सुनीलराज सूर्यवंशी यांचे के. पी. पाटील हे मामा. भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांची पुतणी राष्ट्रवादीच्या ए. वाय. पाटील यांच्या मुलग्याला दिली आहे. कागलचे शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या सूनबाई म्हणजे राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये गेलेले अरुण इंगवले यांच्या कन्या; तर कागलच्या ज्युनिअर घाटगे घराण्यातील मृगेंद्रराजे घाटगे यांच्या कन्या या आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी. पन्हाळ्याचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील हे इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष झालेल्या अरुण नरके यांचे मामा; तर आमदार चंद्रदीप नरके हे पुतणे. यशवंत एकनाथ आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतअप्पा पाटील हे नातेवाईकच. शिरोळमधील जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठल नाईक-निंबाळकर यांच्या कन्या उदयानी या इकडे करवीरमध्ये आल्यानंतर कॉँग्रेसच्या गोटात आहेत. भूविकास बॅँकेचे माजी अध्यक्ष युवराज पाटील यांची कन्या ‘गोकुळ’चे चेअरमन विश्वास पाटील यांच्या पुतण्याला दिली आहे. शाहूवाडीत मानसिंगराव गायकवाड आणि कै. संजयसिंह गायकवाड हे चुलतबंधू. मात्र त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दोघांचे चिरंजीव रणवीर आणि योगीराज यांची आता जिल्हा परिषदेत लढत होण्याची चिन्हे आहेत. कधी एकत्र, तर कधी विरोधात !यातील अनेक नातेवाईक नेत्यांचे राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत. त्यामुळे कधी एकत्र, तर कधी विरोधात असे चित्र पाहावयास मिळते. चंदगडमधील नरसिंगराव पाटील आणि त्यांचे मामा व्ही. के. चव्हाण-पाटील यांच्यातील संघर्ष जिल्ह्याने पाहिला. त्याचा दुसरा अध्याय तर नरसिंगराव पाटील आणि त्यांचे मेहुणे गोपाळराव पाटील यांच्या संंघर्षाने रंगला. भैया कुपेकरांनीही दिला होता झटकावीस वर्षांपूर्वी एकीकडे कॉँग्रेसमधून बाबासाहेब कुपेकर विधानसभा लढवीत असताना त्यांचे सख्खे बंधू भैया कुपेकर यांनी शिवसेनेतून उमेदवारी घेत विरोध केला आणि त्यावेळी जनता दलाचे श्रीपतराव शिंदे विजयी झाले. आत्ताही संध्यादेवी कुपेकर आणि त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्याविरोधात भैया कुपेकर, बाळ कुपेकर, संग्राम कुपेकर यांनी दंड थोपटले आहेत. रामराजे महाडिकांसोबतएकीकडे नात्यांमध्येच विरोध होत असताना खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र आपल्या भावोजींना अंतर दिलेले नाही. रामराजे कुपेकर यांचे सख्खे भाऊ संग्राम हे शिवसेनेतून राजकारण करीत असताना रामराजे यांनी धनंजय महाडिक आणि काकी संध्यादेवी यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. रामराजे हे गेली अनेक वर्षे निष्ठेने धनंजय यांच्यासोबत आहेत. परिणामी सध्या ते ‘गोकुळ’चे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.
राजकारणात नात्यांचा गुंता
By admin | Updated: January 16, 2017 00:40 IST