उत्तूर :
ज्या पद्धतीने आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्पाचे घळभरणीचे काम गतीने सुरू आहे. त्या पद्धतीने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम नाही त्यामुळे घळभरणीचे काम थांबवून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून धरणग्रस्तांनी केली आहे.
प्रकल्पस्थळावर झालेल्या मंत्री महोदय, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पुनर्वसन अधिकारी व धरणग्रस्तांसमवेत पुनर्वसनाबाबत बैठक झाली; मात्र धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत.
धरणाच्या लाभक्षेत्रातील संपादित झालेल्या जमिनीवर स्थगिती आल्याने जमिनी संपादन प्रक्रिया थांबली आहे. महिना झाला तरी संपादित जमिनीवरील स्थगिती आदेश उठलेला नाही.
संकलन रजिस्टरमधील चुका दुरुस्त झाल्या नाहीत. पुनर्वसन कायद्याप्रमाणे जमीन वाटप करा, असा कायदा असताना त्याची पूर्तता झाली नाही. प्रकल्पग्रस्तांची शिल्लक असणारी जमीन संपादित केली आहे. त्या जमिनीचे ६५ टक्के रक्कम भरून घेऊन पर्यायी जमिनीसाठी पात्र ठरवावे. वर्ग - २ च्या जमिनी वर्ग - १ च्या करून मिळाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता कैतान बारदेस्कर यांच्याकडे धरणग्रस्तांनी केली.
निवेदनावर कॉ. संपत देसाई, शिवाजी गुरव, सचिन पावले, महादेव खाडे, राजू देशपांडे, शिवाजी येजरे, बजरंग पुंडपळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
------------------------
फोटो ओळी : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे मागण्यांचे निवेदन प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता कैतानबार देस्कर यांच्याकडे देताना धरणग्रस्त.
क्रमांक : ०४०५२०२१-गड-०१