राधानगरी : प्राथमिक नोकरीच्या ठिकाणी राहण्याची सक्ती करण्याच्या निषेधार्थ शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याऐवजी त्यात अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे याबाबत सर्वंकष अभ्यास करून त्याचा फेरविचार करावा, असा ठराव राधानगरी पंचायत समितीच्या काल, बुधवारी झालेल्या मासिक सभेत करण्यात आला. सभापती रुपालीदेवी पाटील अध्यक्षस्थानी होत्या.सावर्डे पाटणकर येथे पुण्याहून आलेल्या तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले. त्याच्यावर उपचार झाल्याने तो बरा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. विशेष घटक योजनेतून वाटप झालेल्या गाई, म्हशींबाबत चौकशी करावी व गैरवापर केलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना करण्यात आली. संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनेसाठी नळपाणी योजना ुदुरुस्ती व कूपनलिका खोदण्याचा २५ लाखांचा कृती आराखडा केल्याचे सांगण्यात आले.लाडवाडी येथे रोजगार हमीतून रस्ता तयार करण्यासाठी मजूर तयार आहेत, पण यंत्रणा सहकार्य करत नाही. बहिष्कार असल्याचे संबंधित सांगतात. याउलट रोपवाटिकांची कामे मात्र केली जातात. यातील ‘अर्थ’ काय? याबाबत ऊसतोडणी मजुरांना रोजगार हमी योजनेतून मजुरी द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दर मिळेल, असे अमित पोवार यांनी सुचवले.महिला व बालकल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या तयार घरपोच आहारावर टीका झाली. हा आहार मुलांना खाण्यायोग्य नसल्याने जनावरांना घातला जातो, असे सदस्यांनी सांगितले. गव्यांनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना पाच लाख ४० हजार रुपये भरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात आले. हसणे ते दाजीपूर या चार किलोमीटर रस्त्याचे काम नव्याने करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. सभेत उपसभापती सुप्रिया साळोखे, गायत्रीदेवी सूर्यवंशी, वंदना पाटील, कविता पाटील, माया लिंग्रस, संगीता कांबळे, गटविकास अधिकारी एच. डी.नाईक यांचाही सहभाग होता. पंचायत समितीसह विविध शासकीय खातेप्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुख्यालयी निवासाबाबत फेरविचार करावा
By admin | Updated: November 21, 2014 00:34 IST