शित्तूर-वारुण : चांदोली धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा कमी झाल्याने धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. परिणामी गेल्या सहा दिवसांपासून पुराच्या पाण्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. वारणा नदीवरील शित्तूर-आरळा, सोंडोली-चरण, सोंडोली-मालेवाडी या पुलावरील पाणी कमी झाल्याने या मार्गांवरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
सध्या चांदोली धरणाच्या सांडव्यातून ७ हजार ४७५ क्युसेक, तर पायथा गेटमधून ५०५ क्युसेक, असे एकूण ७ हजार ९८० क्युसेक प्रतिसेकंद पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. चांदोली धरण क्षेत्रात गेल्या सहा दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम होता.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने धरणातून २८ हजार २५० क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू ठेवला होता.
परिसरातील उखळू, शित्तूर-वारूण, शिराळे-वारूण, खेडे, सोंडोली, रेठरे, मालेवाडी, जांबुर, विरळे आदी गावांतील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. अनेक घरांची पडझड झाली आहे. नदीकाठच्या ऊस व भात पिकांमध्ये सहा दिवस पाणी राहिल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सहा दिवसांपूर्वी गेलेली वीज अद्याप परतू शकली नसल्यामुळे नागरिकांची दळप-कांडपाची मोठी गैरसोय झाली आहे.
दरम्यान, आजवर चांदोली धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने २००० मि.मी.चा टप्पा पार केला असून आज सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासांत २७ मी.मी., तर आजअखेर २०५० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या ९ हजार १०१ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. मंगळवारी सकाळी धरणात ८८७.३९३ द.ल.घ.मी. म्हणजेच धरणात ३१.३४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणीपातळी ६२४.३० मीटरवर पोहोचली आहे.