कोल्हापूर : जगभरातील खवय्यांना लुभावणाऱ्या ‘तांबड्या-पांढऱ्या रश्श्या’ची महती आता विश्वकोशापर्यंत पोहोचली आहे. कोल्हापूरच्या मटणाबाबतची माहिती असलेल्या एल्सेवियर आॅक्सफर्ड प्रकाशनच्या ‘एन्सायक्लोपीडिया आॅफ मिट सायन्सेस’ या विश्वकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उद्या गुरुवारी इंग्लंडमध्ये होणार आहे. कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. सुधाकर भंडारे यांनी हे लेखन विश्वकोशात केले आहे. महाराष्ट्रातील व कोल्हापूरच्या मटणाने खवय्यांसाठी नेहमीच भुरळ घातली आहे. त्यामुळे मुंबई येथील महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहायक अधिव्याख्याता असलेले भंडारे यांनी ही मटणाची माहिती जाणीवपूर्वक विश्वकोशात प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सध्या ते नॉटिंगहॅम विद्यापीठात पीएच. डी.चे संशोधन करीत आहेत. त्यांचे माध्यमिक शिक्षण आजरा येथील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण आजरा महाविद्यालयात झाले आहे. त्यांनी पॅरामिलिटरी फोर्समध्ये ‘असिस्टंट कमांडंट’ म्हणूनही काम केले आहे. विश्वकोशासारख्या नामांकित प्रकाशनामध्ये डॉ. भंडारे यांनी ‘भारतीय उपखंडांतील पारंपरिक मांसाहार’ या लेखामध्ये कोल्हापुरी मटण, तांबडा व पांढरा रस्सा याची माहिती दिली आहे. त्यामध्ये वैशिष्ट्ये, करण्याची पद्धत दिली आहे. त्यामुळे हा पदार्थ आता जगभरातील खवय्यांना माहीत होणार आहे.
‘तांबडा-पांढरा’ विश्वकोशात
By admin | Updated: August 13, 2014 23:34 IST