संतोष मिठारी -कोल्हापूर -प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर होत असलेला परिणाम लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी विद्यापीठांना कडक आदेश दिले आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी पदे भरण्यास ‘यूजीसी’ने ‘डेडलाईन’ दिली आहे. रिक्त पदे ठेवणाऱ्या विद्यापीठांचे अनुदान बंद केले जाणार आहे. यूजीसीच्या अशा आदेशापूर्वीच शिवाजी विद्यापीठाने प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत प्रक्रिया राबविली आहे. रिक्त ३८ पदे भरण्यास विद्यापीठाकडे सात महिने आहेत, त्यामुळे ‘यूजीसी’कडून विद्यापीठाचे अनुदान थांबणार नसल्याचे चित्र आहे.विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या रिक्त पदांवर सीएचबी तसेच कंत्राटी पद्धतीवर प्राध्यापक नेमले जातात. त्यातील अनेकजण दुसऱ्या महाविद्यालयांत चांगले मानधन, संधी मिळाल्यास निघून जातात. पूर्णवेळ प्राध्यापक नसल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांनादेखील त्याचा फटका बसतो. ते टाळण्यासाठी यूजीसीने पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी प्राध्यापकांची रिक्त पदे भरा, अन्यथा अनुदान बंद केले जाईल, असा कडक आदेश दिला आहे. ‘यूजीसी’चा अशा स्वरूपातील आदेश येण्यापूर्वीच शिवाजी विद्यापीठाने प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअंतर्गत गेल्या दोन वर्षांत विद्यापीठाने ५९ प्राध्यापकांची भरती केली आहे. त्यात प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर अशा पदांचा समावेश आहे. सध्या आठ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असून उरलेल्या ३० पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पदे भरण्यास यूजीसीने दिलेली मुदत लक्षात घेता विद्यापीठासाठी सात महिन्यांची ‘डेडलाईन’ आहे. पदे भरलेली आणि रिक्त असलेली आकडेवारी पाहता यूजीसीकडून विद्यापीठाचे अनुदान थांबणार नसल्याचे चित्र स्पष्ट होते. पदांच्या भरतीबाबतची विद्यापीठाची कार्यवाही शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्यासह विद्यार्थ्यांना दिलासा देणारी आहे.एस. टी. प्रवर्गातील पदांबाबत अडचणविद्यापीठातील पदे आरक्षणानुसार भरावी लागतात. ओबीसी, एस. सी. आदी प्रवर्गांतील पदांसाठी शैक्षणिक, संशोधन या पातळीवरील निकष पूर्ण करणारे उमेदवार मिळतात. मात्र, एस. टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील पदांबाबत आवश्यक निकष पूर्ण करणारे उमेदवार मिळत नसल्याची अडचण आहे. त्यामुळे काही पदे रिक्त राहत आहेत.विद्यापीठातील प्राध्यापकांची २१५ पदांपैकी १८८ पदे भरली आहेत. अजून साधारणत: ३७ पदे भरावयाची बाकी आहेत. त्याची प्रक्रिया सुरू आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाकडून जी ५० ते ५२ पदे मंजूर झाली. ती शासनाच्या आदेशानुसार २०१८ पर्यंत भरावयाची आहेत. विद्यापीठाने रिक्त पदांपैकी ८० टक्के पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे ‘यूजीसी’ला आमचे अनुदान थांबविण्याची वेळच येणार नाही.- कुलगुरू डॉ. एन. जे. पवारआकडेवारी दृष्टिक्षेपात...४विद्यापीठातील पूर्णवेळ प्राध्यापकांची संख्या : १८८४ दोन वर्षांत भरलेली पदे : ५९४भरतीच्या प्रक्रियेत असलेली पदे : ८४रिक्त असलेली पदे : ३०
‘यूजीसी’च्या बडग्याअगोदरच विद्यापीठात होणार भरती
By admin | Updated: November 15, 2014 00:06 IST