कोल्हापूर : महापालिकेत घरफाळा घोटाळा झाला आहे की नाही आधी जाहीर करा आणि झाला असेल तर घरफळा बुडवणारे करदाते आणि घोटाळा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करावी, अशी आग्रही मागणी मंगळवारी कोल्हापूर शहर नागरी कृती समितीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
महानगरपालिकेतील घोटाळ्याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होत नाही म्हणून कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दि. ९ जुलै रोजी जलसमाधी आंदोलन जाहीर केले होते. त्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी कृती समितीला आंदोलन स्थगित करून चर्चेस बोलवले होते. त्यानुसार बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त विनायक औंधकर,उपअधीक्षक विजय वणकुद्रे हजर होते.
कृती समितीला वेळोवेळी महापालिकेने कोणती लेखी आश्वासने दिली याची कोणतीच माहिती अधिकाऱ्यांनी प्रशासकांना दिलेली नव्हती. या संदर्भात प्रशासकांना अनभिज्ञ ठेवले होते. त्यामुळे प्रशासकांनी सहायक आयुक्त औंधकर व घरफाळा विभागाची संतप्त झाडाझडती घेतली. कृती समितीने मागणी केलेल्या भोगवटाप्रमाणे बिलाचे वितरण का केले नाही, अशी विचारणा केली. कृती समितीच्या अशोक पोवार, रमेश मोरे यांनी केलेल्या तक्रारी व मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन बलकवडे यांनी या विभागाचे लेखा परीक्षण करून घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाऊ घोडके चंद्रकांत पाटील, महेश जाधव, विनोद डुणुंग यांनी बैठकीत सहभाग घेतला.
फोटो क्रमांक - १३०७२०२१-कोल-केएमसी
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळाप्रकरणी कोल्हापूर शहर नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन घोटाळ्यासंबंधी चर्चा केली.