कोल्हापूर : घरफाळा विभागातील घोटाळ्यांची नेमकी व्याप्ती समोर यावी, त्रुटींचा अभ्यास करून दुरुस्ती करता यावी, यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी विभागाचे लेखापरीक्षण सुरू केले. मागील महिन्यात २०१२-१३ या आर्थिक वर्षात तब्बल २७०० हून अधिक मिळकतधारकांना दंड व व्याजाच्या रकमेत तब्बल दोन कोटी रुपयांची सूट दिल्याचा प्रकार पुढे आला होता. आता आज, मंगळवारपासून २०१०-११ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरू करण्यात आल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. घरफाळ्यात आढळलेल्या त्रृटी या आर्थिक घोटाळा नसून, संगणकीय चूक असल्याचा खुलासा येथील कनिष्टांपासून अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्तांनी २०१२-१३ सालातील सर्व प्रकरणांची तपासणी केल्यानंतर २७००हून अधिक प्रकरणात दंड व व्याजात परस्पर सूट दिल्याचे पुढे आले. ही रक्कम त्या मिळकतधारकांंकडून वसूल करावी, त्यांच्याकडून वसूल न झाल्यास याची संपूर्ण जबादारी संबंधित कर्मचाऱ्यांची असेल, असे आदेश आयुक्तांनी दिले. गेल्या सहा-सात वर्षांचे लेखापरीक्षण करण्याचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले आहे. यामुळे सध्या घरफाळा विभागात काम न करणारे पूर्वाश्रमीचे कर्मचारी व अधिकारीही आयुक्तांच्या रडावर येणार आहेत. या लेखापरीक्षणात मोठ्या रकमेचा घोटाळा व अव्यवहार पुढे येण्याच्या धास्तीने विभागातील कर्मचारी व अधिकारी हादरून गेले आहेत. (प्रतिनिधी)
घरफाळा विभागाचे पुन्हा लेखापरीक्षण
By admin | Updated: June 2, 2015 01:20 IST