कोडोली : येथे यशस्वी सोशल वेल्फेअर फाउण्डेशनमार्फत मकरसंक्रांतीनिमित्त नूतन महिला ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन व हळदीककुंकू असे संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील हौसिंग सोसायटीच्या सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण समूहाच्या अध्यक्ष पद्मजा पाटील होत्या. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या पन्हाळा पूर्व परिसरातील ८० नूतन महिला सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
फाउण्डेशनच्या अध्यक्ष विनिता जयंत पाटील यांनी महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असून, स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. आश्विनी भोसले यांनी बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी विविध उपक्रम राबवून स्वावलंबी कसे बनावे याबाबत माहिती दिली, तर दिग्विजय पाटील यांनी मशरूम शेतीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी करमणूक म्हणून स्पॉट गेमचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमृता अमरसिंह पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती गीतादेवी पाटील, गायत्री पाटील, वैशाली पाटील, मंगला पाटील , फाउण्डेशनच्या उपाध्यक्षा वैशाली पोवार व परिसरातील सुमारे आठशेेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन सुप्रिया केकरे यांनी केले, तर आभार भारती साळोखे यांनी मानले.
फोटो ओळ फोटो क्र १ : कोडोली येथे यशस्वी फाउण्डेशनमार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित ग्रामपंचायतीच्या नूतन महिला सदस्या.
फोटो कं २ : कोडोली येथे ग्रामपंचायत नूतन महिला सदस्यांचा सत्कार करताना विनिता पाटील, पद्मजा पाटील यांच्यासह अन्य महिला.