हुपरी : रांगोळी (ता. हातकणंगले) येथील बसस्थानकानजीक उभारलेल्या राष्ट्रपुरुषांच्या फलकाची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्यावरून ग्रामपंचायत कार्यालयावर दगडफेक, रास्ता रोको, आंदोलक व ग्रामस्थांत वादावादी, एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी, निषेध सभांमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय साळुंखे व लोकप्रतिनिधींनी परिस्थिती हाताळल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.भीमा कोरेगावमध्ये (१ जानेवारी १८१८) शौर्य दिनानिमित्त राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र असणारा फलक रांगोळी गावातील बसस्थानकानजीक उभारला होता. अज्ञातांनी आठ दिवसांपूर्वी हा फलक काढला होता. त्यामुळे गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून ग्रामपंचायतीने त्याच ठिकाणी दुसरा फलक उभारला होता. हा फलकही समाजकंटकांनी काल, बुधवारी रात्री फाडून त्याची विटंबना केली. हे निदर्शनास येताच ग्रामपंचायतीने पहाटे तो फलक हटविला. ही माहिती समजताच संतप्त जमावाने ग्रामपंचायतीवर दगडफेक केली. रस्त्यावर टायरी पेटवून रास्ता रोको केला. परिणामी इचलकरंजी-हुपरी मार्गावरील वाहतूक बंद केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी आले. त्यांनी त्वरित ग्रामस्थ व आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या समाजकंटकांना अटक करावी आणि उभारलेले सर्वच फलक हटवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्याला एका समाजाने आक्षेप घेतल्याने दोन्ही समाजात वादावादी झाली. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले. त्यानंतर एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम होईपर्यंत त्या समाजाचे फलक ठेवण्याचा निर्णय झाला. (वार्ताहर)
राष्ट्रपुरुषांच्या फलकाची विटंबना
By admin | Updated: January 16, 2015 00:25 IST