प्रदीप शिंदे -कोल्हापूर -‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण सर्वच जाणतो. जुन्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे. वाचनाव्यतिरिक्त मोबाईल, टी.व्ही., चित्रपट, इतर मनोरंजनाची साधने इतकी वाढली आहेत की, या सर्व गलबल्यात वाचनासाठी निवांतपणाच मिळेनासा झाला आहे. हीच वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी एस.टी. बसचालकांची धडपड सुरू आहे. वाचनसंस्कारच घराघरांतून हरवला आहे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृत्तीच नाहीशी झाली आहे. पालकही याबाबत उदासीन आहेत. हीच बाब लक्षात घेऊन कोल्हापूर-दिगवडे या एस.टी. बसमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. चालक, वाहक व येथील काही कृष्णभक्तांनी या एस.टी. बसचे नाव बदलून ‘श्री राधाकृष्णा एक्सप्रेस’ असे नामकरण केले आहे; प्रवाशांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा, यासाठी प्रवाशांच्या खिडकीजवळ छोट्या-छोट्या बॉक्समध्ये पुस्तके व वृत्तपत्रे ठेवली आहेत. प्रवासी नक्कीच प्रवासादरम्यानही पुस्तके हाताळतात. यातून त्यांना वाचण्याची आवड निर्माण झाली आहे. सोबत पुस्तक घरी घेऊन जाऊन वाचण्याची इच्छा असेल तर त्याला पुस्तक दिले जाते. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी एस.टी. बसमध्ये आम्ही प्रवाशांना वाचण्यासाठी पुस्तके ठेवली आहेत. या उपक्रमाला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण वाट पाहून आमच्या गाडीतूनच प्रवास करीत असल्याने या गाडीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. - तानाजी माने, चालकया गाडीतून प्रवास करताना वेळ कधी संपतो तेच कळत नाही. धावत्या जगामध्ये वाचनासाठी वेळ नसला तरी धावत्या एस.टी.मध्ये वाचनाची सोय झाल्याने आनंद वाटतो. हा उपक्रम फक्त एका गाडीत न राबविता सर्वत्र राबविला पाहिजे.- शरद पाटील, प्रवासी
वाचनसंस्कृती रुजवत धावते ‘राधाकृष्ण एक्स्प्रेस’
By admin | Updated: June 30, 2015 00:22 IST