शिरोळ : चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला शासनाच्या एफआरपीप्रमाणे २५३७ ही एकरकमी विनाकपात रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. एफआरपी अधिक प्रतिटन १७५ हा झालेला निर्णयही शासनाच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात येईल. शेतकरी व कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत आहे, असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. शिरोळ दत्त साखर कारखान्याचा ४५ वा ऊस गाळप प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पाटील बोलत होते. प्रारंभी शहीद जवान राजेंद्र तुपारे व नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालक अनिल यादव, श्रेणिक पाटील, अरुणकुमार देसाई, रणजित कदम यांच्या हस्ते काटापूजन झाले. अध्यक्ष पाटील म्हणाले, मागील गळीत हंगामात सभासदांनी दाखविलेल्या प्रचंड विश्वासावर आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरीत्या हंगाम पार पाडला. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केल्याने उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तसेच यावर्षीचे ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याची विश्वासार्हता पाहून आपला संपूर्ण ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, जयरामबापू पाटील, बंडा माने, राजू पाटील-टाकवडेकर, सर्जेराव शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. प्रास्ताविक रावसाहेब भोसले यांनी केले.यावेळी शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रघुनाथ पाटील, प्रमोद पाटील, अण्णासो पवार, विजय सुर्यवंशी, विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगीता पाटील, महेंद्र बागे, बाबूराव पाटील, सचिव बी. बी. शिंदे, नाना कदम, विश्वजित शिंदे, श्रीशैल्य हेगाण्णा, धोंडिराम दबडे पदाधिकारी, संचालक, कामगार उपस्थित होते. युसुफ मेस्त्री यांनी आभार मानले. दत्त कारखान्याकडून सेंद्रिय शेतीचा प्रयोगदत्त कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर पाच सभासदांच्या ऊसक्षेत्रावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग हाती घेतला असून शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीनुसार या उत्पादनाला चांगला दर मिळणार आहे. तसेच सेंद्रिय शेती केल्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेतीतून उत्पन्न जादा मिळणार आहे. शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळावा यासाठी कारखान्याकडून एक पाऊल पुढे येऊन हा कार्यक्रम राबविला जात आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत ऊस गाळपाचा प्रारंभ दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी एम. व्ही. पाटील, युसुफ मेस्त्री, रणजित कदम, इंद्रजित पाटील, सिदगोंडा पाटील, अनिल यादव, सत्येंद्रराजे निंबाळकर, सर्जेराव शिंदे यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते.
सर्वांच्या बरोबरीने दर देणार
By admin | Updated: November 9, 2016 00:57 IST