लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात २०१९ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत यावे, म्हणून राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी महिन्याभरात रश्मी शुक्ला यांच्या फोनच्या सीडीआरची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आग्रह करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, शुक्ला यांच्यावरील या आरोपांबाबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही दुजोरा दिला आहे. वास्तविक अशा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी अशा कामांमध्ये असणे, हे अत्यंत गंभीर असून मंत्र्यांचेच फोन रेकॉर्ड करणे बेकायदेशीर आहे. महाविकास आघाडी भक्कम असून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न विसरून जावे.
--------------------------------
अधिकारी खाल्ल्या मिठाला जागले
भाजप सरकारच्या काळात बऱ्याच अधिकाऱ्यांना हवे तिथे पोस्टिंग मिळाल्याने ते खाल्ल्या मिठाला जागत आहेत. वास्तविक त्यांनी कुणा व्यक्तीच्या नव्हे, तर सरकारच्या खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे. मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांबाबतीत योग्य ती खबरदारी घेऊन कारवाई करतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.