कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील बजागेवाडी येथे मलकापूरच्या प्रा. डॉ. एन. डी पाटील महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद ऐतवडे आणि त्यांचे सहकारी डॉ. पांडुरंग बागम यांना जास्वंद कुळातील आकर्षक व सुंदर असा दुर्मिळ पिवळ्या फुलांचा काटेसावरीचा फुललेला वृक्ष आढळला.सामान्यत: ही फुुले लालसर गुलाबी रंगाची असतात. यामुळे कोल्हापूर जिल्हा हा जैविविधतेने समृद्ध असल्याचे अधोरेखित झाले आहे. या अस्सल देशी वृक्षाला हेरिटेज अर्थात वारसा वृक्षाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे, असे मत डॉ. मकरंद ऐतवडे यांनी व्यक्त केले आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये काटेसावरीला लालसर गुलाबी फुले येतात.परंतु, काही ठिकाणी संपूर्ण पिवळी फुलेही आढळतात. काटेसावरचे शास्त्रीय नाव बॉम्बॅक्स सीबा (कापूस) हे दक्षिण अमेरिकेतल्या नावावरून तयार केले आहे. याला शाल्मली असे संस्कृत नावही आहे. हा वृक्ष १५ ते २५ मीटर उंच वाढतो. याच्या खोडावर आणि फांद्यांवर काटे असतात. याची पाने संयुक्त असून, त्यावर ३ ते ७ पाने असतात. फळे बोंड प्रकारची असून, त्यात कापूस आणि बिया असतात.
थोडा इतिहास..
- वनस्पतितज्ज्ञ सांतापाऊ यांच्याकडून १९६६ मध्ये पिवळ्या रंगाची फुले देणाऱ्या पहिल्या वृक्षाची शास्त्रीय नोंद
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनक्षेत्रात पिवळी फुले देणारे वृक्ष पाहिल्याची डॉ. अलमेडा यांची नोंद
- अशा वृक्षांना बॉम्बॅक्स सीबा व्हरायटी ल्युटीया असे शास्त्रीय नाव आहे.
- डॉ. वर्तक आणि कुंभोजकर यांच्याकडून १९८४ मध्ये पांढरी फुले असणाऱ्या काटेसावरीची नोंद
- डॉ. मधुकर बाचूळकर यांना २००८ मध्ये आढळला होता चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडीत पिवळ्या रंगाची फुले असणारा काटेसावरचा वृक्ष
- गगनबावडा रोडवर शेणेवाडीजवळ रस्ताच्या कडेस एकाच फांदीवर गुलाबी-पिवळी फुले असलेला एकमेव दुर्मिळ वृक्षाची नोंद