लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मतमोजणीनंतर रॅली, मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेकरिता मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी फक्त यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अन्य कोणालाही मतमोजणी केंद्रात व मतमोजणी परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मतमोजणी प्रतिनिधी, कर्मचारी व उमेदवारांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्याचा अहवाल पाहूनच निवडणूक यंत्रणेने संबंधितांना प्रवेश पास दिले आहेत. त्याशिवाय कोणी मतमोजणी केंद्र परिसरात फिरत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर निकालानंतर रॅली, मिरवणूक काढल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासनाने दिली.