लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वेगवान घडामोडी घडत असून, शुक्रवारी माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर अवघ्या पाच दिवसात स्वगृही परतले. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील हेही मार्गावर असून, शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचीही सत्तारूढ गटात एंट्री होणार असल्याचे समजते. आमदार पाटील व आबिटकर यांची शनिवारी सत्तारूढ गटाच्या नेत्यांसोबत बैठक होत आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत शह-काटशहाचे राजकारण जोरात सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विरोधी राजर्षी शाहू आघाडीने सत्तारूढ गटातील नेत्यांना आपल्यासोबत जोरदार धक्के दिले होते. ही निवडणूक एकतर्फी होते की काय, अशी परिस्थिती झाली असतानाच सत्तारूढ गटातील नेते शांतपणे व्यूहरचना आखत होते. सोमवारी (दि. २२) पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक यांनी शाहू आघाडीची घोेषणा केली. भाजप विरोधाचे कारण पुढे करत सगळी मोट बांधली खरी मात्र अनेकांची आपापल्या मतदारसंघात गोची झाली. विरोधी आघाडीसोबत आमदार विनय काेरे आल्याने सत्यजित पाटील- सरूडकर यांची अडचणी वाढल्या. त्यात आमदार काेरे यांच्या कर्णसिंह गायकवाड व अमर पाटील यांच्या रूपाने दोन जागा पदरात पडणार असल्याने २०२४च्या विधानसभा निवडणुकीत सरूडकर यांची डोकेदुखी ठरू शकते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षा सरूडकरच अस्वस्थत होते. त्यातून कार्यकर्त्यांच्या बैठका लावून खदखदीला तोंड फोडले आणि शुक्रवारी सत्तारूढ गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
सत्यजित पाटील यांच्याप्रमाणे आमदार प्रकाश आबिटकर यांचीही राधानगरी-भुदरगड मतदारसंघात अडचण आहे. त्यांचे विधानसभेसह ‘बिद्री’मध्ये के. पी. पाटील विरोधक आहेत. त्याचबरोबर ‘राधानगरी’च्या राजकारणात आबिटकर यांना आमदार पी.एन. पाटील यांची मदत होते. त्यामुळे विरोधी आघाडीसोबत जाणे हे आबिटकर यांच्यासाठी फायद्यापेक्षा तोट्याचे आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आबिटकर व सत्तारूढ गटाच्या नेत्यांची बैठक झाल्याचे समजते. शनिवारी आबिटकर यांनी गारगोटी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून, त्यामध्ये ते घोषणा करण्याची शक्यता आहे.
आमदार राजेश पाटील यांचे विरोधक गोपाळराव पाटील यांना कॉंग्रेसमध्ये घेऊन ताकद देण्याचा प्रयत्न पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत आमदार पी.एन. पाटील यांनी आमदार पाटील यांना उमेदवारी दिली, त्याचबरोबर दिवंगत नेते नरसिंगराव पाटील यांच्या निधनानंतर जिल्हा बँकेत स्वीकृत म्हणून घेण्यात पुढाकार घेतला. त्यांना आमदार करण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांची ताकद महत्त्वाची असली तरी पी. एन. पाटील यांचे पाठबळही मोलाचे ठरले. आता त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या कानावर घालून सत्तारूढ गटासोबत जाण्याची तयारी केली आहे.
राजेश पाटील यांच्या मनात ‘दौलत’चा राग
‘दौलत’ चंदगड तालुका संघास चालवण्यास द्यावा, असे प्रयत्न स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांच्यासह राजेश पाटील यांचे होते. जिल्हा बँकेने दुसऱ्या कंपनीला चालवण्यास दिल्यापासून राजेश पाटील नाराज आहेत.
जिल्हा बँकेला भरमुण्णांचा बिनशर्त पाठिंबा
आमदार राजेश पाटील यांनी विरोधी भूमिका घेतल्यानंतर पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ हे स्वस्थ बसणार नाही. या निर्णयामुळे जिल्हा बँकेसह विधानसभेचे गणित बिघडू शकते. यासाठी माजी राज्यमंत्री भरमुण्णा पाटील यांनी जिल्हा बँकेला राजेश पाटील यांना बिनशर्त पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
भुदरगडमधील माजी संचालकही सत्तारूढ गटासोबत
भुदरगडमधील ‘गोकुळ’च्या एका माजी संचालकाने माजी आमदाराची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तारूढ गटाच्या नेत्यांची भेट घेऊन उमेदवारी नको; पण भविष्यातील राजकारणात संधी देण्याची मागणी केली. तुमचा योग्य सन्मान करण्याचा शब्द नेत्यांनी दिल्याचे समजते.