कोल्हापूर : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांना पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा वाटा कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात असतानाच यड्रावकर यांनी त्यांना मंजूर करण्यात आलेल्या निधीतून लाखो रुपयांची कामे सुचविल्याचे समजते. त्यांना निधी नको, अशी भूमिका घेऊन काही जिल्हा परिषद सदस्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेणार होते. त्याआधीच यड्रावकर यांनी ही कामे सुचविली आहेत.
पंधराव्या वित्त आयोगातून जो निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे त्यातील काही निधी मुश्रीफ, पाटील आणि यड्रावकर यांना देण्याचे निश्चित करण्यात आले. मुश्रीफ आणि पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले. यानंतर या दोघांनीही सदस्यांसाठी निधी आणला. चौथ्या मजल्याचे बांधकाम सुरू झाले. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांना निधी देण्याबाबत सत्तारूढ सदस्यांची ना नाही.
परंतु यड्रावकर यांना निधी देण्यास मात्र सत्तारूढमधील काही निवडक सदस्यांचा विरोध आहे. त्यांचा हा विरोध सध्या चर्चेत होता. सत्तांतरामध्ये यड्रावकर यांची काही भूमिका नव्हती तसेच त्यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य नाहीत. मग त्यांना निधी कशासाठी, असा सवाल या सदस्यांकडून केला जात आहे. यासाठी उर्वरित दोन्ही मंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्याआधीच यड्रावकर यांनी त्यांना मंजूर केलेल्या २५ लाखांच्या निधीतून विविध गावची विकासकामे सुचविल्याचे समजते.
चौकट
वेगळा संदेश नको म्हणून निधी
जरी यड्रावकर हे थेट जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये सक्रिय नसले तरी ते महाविकास आघाडीचे मंत्री आहेत. त्यातही आरोग्य राज्यमंत्री आहेत. त्यामुळे निधी वितरणातून त्यांना डावलल्यास त्याचा संदेश वेगळा जाईल, अशी नेते, पदाधिकाऱ्यांची भूमिका असल्याचे समजते. त्यामुळे यड्रावकरांच्या निधीमध्ये फार अडचण येईल असे वाटत नसल्याचे सांगण्यात आले.