कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील किंवा जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना मिळाल्यास शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सक्षम उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. या हालचालींमागे आमदार महादेवराव महाडिक हेच आहेत. इचलकरंजीतील ‘आवाडे गटाच्या कट्टर विरोधक’ असलेल्या शहर विकास आघाडीने या निवडणुकीत आवाडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय याच घडामोडींचा भाग असल्याचे मानण्यात येत आहे.या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारीतील सतेज पाटील यांचा दावा भक्कम मानला जात आहे. दोन्ही काँग्रेसची सुमारे पावणेतीनशे मते आहेत. सतेज पाटील हे तोडीस तोड ठरू शकतात. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून आव्हान देणे तितकेसे सोपे नाही म्हणून आमदार महादेवराव महाडिक हे स्वत: रिंगणात न उतरता अन्य कुणाला तरी पाठिंबा देतील, असेही बोलले जात आहे. त्यामुळे महाडिक राजकारणात अपराजित राहू शकतात. त्यांचा राजकीय दबदबा कायम राहू शकतो. मग ते नसतील तर सतेज पाटील यांच्या विरोधात लढणार कोण, यासाठी चाचपणी सुरू असून, त्यामध्ये यड्रावकर यांचे नाव सगळ््यात पुढे आहे.यड्रावकर यांचे सतेज पाटील यांच्याशी राजकीय वैर आहे. कुरुंदवाड नगरपालिकेच्या राजकारणात सतेज पाटील यांना मानणारा गट सत्तेत आहे. तिथे आपली सत्ता सतेज पाटील यांनी काढून घेतल्याचा राग यड्रावकर यांना आहे. ‘राष्ट्रवादी’तही यड्रावकर हे आमदार हसन मुश्रीफ यांच्या ‘रेंज’मध्ये सध्या नाहीत. जिल्हा बँकेच्या राजकारणात शिरोळ सेवा संस्था गटातून मुश्रीफ यांनी विठ्ठलराव नाईक यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या यड्रावकर यांनी अपक्ष लढून ही जागा खेचून घेतली. त्यांच्याकडे साखर कारखानदारीचे पाठबळ आहे. जयसिंगपूर नगरपालिकेची सत्ता आहे. त्याशिवाय आवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचाही पाठिंबा त्यांना मिळू शकतो. राष्ट्रवादीतील नाराज गटही त्यांना मदत करू शकतो. तसे झाल्यास ते आव्हान उभे करू शकतात.काँग्रेसची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही याचा अंदाज आल्याने महाडिक यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी त्यांनी आवाडे कुटुंबीयांची व शहर विकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. आवाडे यांचे नाव या स्पर्धेत मागे आहे हे महाडिक जाणून आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारीसाठी पाठिंबा द्यायचा. ‘तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मी तुमच्यासोबतच आहे; परंतु ती नाही मिळाली तर तुम्ही मला पाठिंबा द्या,’ असेही महाडिक यांचे बेरजेचे गणित आहे. यड्रावकर यांच्याबाबतही त्यांचा हाच फॉर्म्युला आहे. ही लढत जिंकण्यासाठी किमान १९१ मते लागतात. महाडिक यांनी अपक्ष म्हणून लढायची तयारी करून शंभर मतांची गोळाबेरीज केली असल्याचे सांगण्यात येते. त्यांना त्याच्या पुढे जायचे असेल तर यड्रावकर किंवा आवाडे हाताला लागावे लागतात. आता त्यांची रणनीती त्यासाठीच काम करीत आहे. (प्रतिनिधी)हे तर नवलच...इचलकरंजीत ‘शविआ’ने आवाडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचेही इचलकरंजीकरांना मोठे नवलच वाटले. ‘शविआ’च्या पाठिंब्याचा आम्हाला किमान काँग्रेसची उमेदवारी मिळण्यासाठी काही मदत होऊ शकेल, असे आवाडे गटाला वाटते, तर प्रत्येकजण आपली ‘किंमत’ वाढवून घेण्यासाठी झटत आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नावाची चर्चा
By admin | Updated: November 28, 2015 00:39 IST