कणकवली : जगात भांडवलशाहीचे लोण फोफावत आहे. या भांडवलशाहीमुळे जगात विषमतेची दरी निर्माण होणार असून, मूठभर लोक जगावर आपले अधिराज्य गाजवतील. ही परिस्थिती उद्भवू नये, म्हणून सर्वांनी या भांडवलशाही विरोधात लढा उभारायला हवा. तसेच भारत देशात पुन्हा वर्णव्यवस्था निर्माण करण्याचा हिंदुत्ववाद्यांचा डाव असून, परिवर्तनवाद्यांसमोर जातिव्यवस्था, जमातवाद, जागतिकीकरण ही आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी परिवर्तनवाद्यांनी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी केले.दर्पण सांस्कृतिक मंचच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कणकवली येथील बुद्धविहार येथे गुरुवारी ‘जय भीम’ महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जय भीम महोत्सवाचे अध्यक्ष सुनील तांबे, सुप्रसिद्ध चित्रकार, नाटककार, चित्रपट संवाद लेखक संजय पवार, संदेश कदम, महेंद्र कदम, अनिल तांबे, आशिष कदम, आदी उपस्थित होते.यावेळी भाई वैद्य म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात हिंदुत्ववाद्यांना बळ प्राप्त झाले आहे. हिंदू राष्ट्र बनविण्याबरोबर भारतीय संविधानचे महत्त्व कमी करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आंबेडकरवादी व परिवर्तन विचारवाद्यांनी लढा उभारणे गरजेचे आहे. भारतीय समाज संस्कृतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेजस्वी तारा होता. देशातील वर्णव्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोडीत काढून समाजातील दुर्लक्षित व शोषितांना न्याय मिळवून दिला. यावेळी दर्पण मंचातर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार संजय पवार व प्रा. सिद्धार्थ तांबे, शिल्पा कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)‘दर्पण’च्या उपक्रमाचे कौतुकभारतीय संविधान हे पुस्तक नसून, आपल्या समाजव्यवस्थेचा पाया व आधार आहे. भगवत्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता मिळावी, ही मागणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज करतात, हे कशाचे द्योतक आहे? असा सवाल करत हिंदुत्ववाद्यांचा पुन्हा देशात वर्णव्यवस्था रुजवण्याचा डाव आहे, असे ते म्हणाले.त्यांचा हा डाव परिवर्तनवाद्यांनी हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे गेली २५ वर्षे दर्पण मंच राबवित असलेले उपक्रम स्तुत्य असून, यापुढेही त्यांनी अशाप्रकारचे उपक्रम राबवित रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भांडवलशाही विरोधात लढा उभारा
By admin | Updated: April 4, 2015 00:14 IST