कोल्हापूर : हवामान खात्याने आठवडाभर पाऊस दडी मारणार असल्याचे सांगितल्यानंतर एका डोळ्यात हसू तर दुसऱ्यात आसू, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. गेले आठवडाभर दमदार हजेरी लावलेल्या पावसाने घेतलेल्या विश्रांतीचा लाभ उठवत सुगी आटोपण्याची धांदल सुरु आहे. सोयाबीन व भुईमुगाची काढणी सुरु झाली आहे. हळव्या जातीचे भात कापणीस आले आहे, मात्र निमगरवा आणि गरवा जातीच्या भाताला पावसाची गरज आहे. शिवाय उशिरा पेरणी झालेल्या पिकांनाही पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
जिल्ह्यात गणपती आगमनाबरोबरच पावसाचेही पुनरागमन झाले. तीन-चार दिवसांच्या पावसातच नद्या पात्राबाहेर पडून नदीकाठची पिके पुन्हा एकदा पाण्याखाली गेली. पावसाने संततधार लावल्याने कापणीस आलेल्या सोयाबीनच्या काढणीत अडथळा आला. बुधवारपासून पावसाने उघडीप दिल्याने थांबलेली कापणी, मळणी गुरुवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. लवकर पेरणी झालेला भुईमूगही काढणीस आला आहे. सोयाबीनला आठ हजारांवर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पडलेल्या उन्हाचा लाभ उठवत मळणीचा वेग वाढवला आहे. शेतमजुरांनी ही संधी साधत मजुरीचे दरही वाढवले आहेत. दिवसभरात दोन ते तीन पाळ्यांमध्ये काम सुरु आहे. खंडून घेऊन कापणी करण्याचीही टूम काढण्यात आली असून, एकरी ३ ते ४ हजार रुपये देऊन कापणी करुन घेतली जात आहे. डिझेलचे दर वाढल्याने मळणीसाठीचे दरही यावर्षी वाढविण्यात आले आहेत.
पाऊस पडून गेल्याने जमिनी मऊ झाल्या आहेत, तोपर्यंत भुईमूग काढणी करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांची घाई सुरु आहे. कुटुंबाला सोबत घेऊन शेंगा तोडणी सुरु आहे. पाऊस कमी होणार आहे, ओल हटले तर शेंगा जमिनीत तुटण्याची शक्यता आहे. उशिरा पेरणी झालेल्या भुईमुगाच्या शेंगा भरत असल्याने आता पावसाची गरज आहे. पण नेमका आता पाऊस होणार नसल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकरी हबकला आहे. निमगरवा व गरवा जातीचे भात भरु लागले आहे. त्याला पाण्याची नितांत गरज असल्याने पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी पाटाने पाणी दिले जात आहे.
चौकट
अंदाज पावसाचा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आठवडाभर पाऊस दडीच मारणार आहे. दि. २३ ते २५ सप्टेंबर याकाळात पडला तर हलका पाऊस पडेल, अन्यथा २८ पर्यंत पाऊस पडणार नाही. २८पासून ५ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर २२पर्यंत पुन्हा पाऊस दडी मारणार आहे. २७ ला हस्त नक्षत्र सुरु होत आहे, या काळात जास्त पाऊस पडतो. पण यावर्षी तो कमी होणार असल्याचा अंदाज आहे.