कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांत दमदार पाऊस सुरू आहे. पंचगंगेची पातळी २७ फुटांवर आहे, तर २१ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात काल, सोमवारी रात्रभर व आज, मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. शाहूवाडी तालुक्यात गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतही चांगला पाऊस सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २७.१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस नसल्याने ओसरलेल्या नद्यांची पातळी हळूहळू वाढू लागली आहे. पंचगंगा नदी २७ फुटांपर्यंत राहिली आहे. आज वारणा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेले असून, जिल्ह्यातील २१ बंधाऱ्यांवर पाणी आहे. सात मार्गांवरील वाहतूक अंशत: बंद असून, चार मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. धरण क्षेत्रात सरासरी ८० मि.मी. पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पातळीतही वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण क्षेत्रात ६५, तर वारणा धरण क्षेत्रात तब्बल १३४ मि.मी. पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. राधानगरी ८६, तर वारणा धरण ८४ टक्के भरले आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद १६००, तर वारणातून १७५८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दूधगंगा अद्यापही ५९ टक्क्यांवरच आहे.
पावसाचा जोर; २१ बंधारे पाण्याखाली
By admin | Updated: July 30, 2014 00:27 IST