जयसिंगपूर : शहरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून जयसिंगपूर पोलिसांनी १२ लाख १७ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून इचलकरंजी व जयसिंगपूर येथील २५ जणांवर कारवाई केली. ही कारवाई सहाव्या व सातव्या गल्लीतील अरुण तावदारे यांच्या बंद असलेल्या तंबाखूच्या गोडावूनमध्ये करण्यात आली. याबाबतची तक्रार पोलीस नाईक चंद्रशेखर कोळी यांनी दिली.
याप्रकरणी संतोष खरात, दावत मलिक शेख, श्रीकांत मगदूम, दिलीप माने, उमेश शिंदे, बाळू धोत्रे, अजित शिंदे, सुनील डोंगरे, अरुण तावदारे, आकाश पवार, प्रदीप सावंत (सर्व रा. जयसिंगपूर), यश सवाईराम, विनायक यादव, सचिन मछले, अरविंद गिरणगे, राजू कांबळे, ओमकार डाकरे, शुभम कुरकुपे, सलीब बागवान, गणेश आवळेकर, किरण देशमुख, सचिन चव्हाण, किरण कांबळे (सर्व रा. इचलकरंजी), दशरथ गाडीवडर (रा. चिपरी), वैभव पाटील (रा. शिरदवाड) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, संशयित संतोष खरात हा जुगार अड्ड्याचा मालक असून सुनील डोंगरे याने पाकिजा कला, क्रीडा, सांस्कृतिक व मनोरंजन जयसिंगपूर या सांस्कृतिक मंडळ सुरू केले आहे. दोघांनी अरुण तावदारे यांच्याशी संगनमत करून त्यांच्या तंबाखू गोडावूनच्या बंद खोलीमध्ये तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख १७ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे, कॉन्स्टेबल विजय भांगरे, संदीप बांडे, नीलेश भोसले, विनायक देसाई, अमोल अवघडे, विलास निकम, विजय पाटील यांच्या पथकाने केली.