अवजड वाहनांचीही भर
भारती विद्यापीठजवळ आरटीओ पासिंग सेंटर असल्याने अवजड वाहने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पासिंग करण्यासाठी येत असतात. या अवजड वाहनांमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. तसेच पुणे - बंगलोर हायवेला जाण्यासाठी हा रस्ता जवळचा असल्याने अनेकजण याच रस्त्याचा आधार घेतात. हा रस्ता अरुंद असल्याने समोरून एखादा ट्रक आला तर मोटारसायकलस्वाराला देखील खड्डे चुकवून गाडी पुढे घेता येत नाही असे चित्र आहे. तसेच या रस्त्यावरील अतिक्रमणही वाहतुकीला अडथळा ठरत आहे.
पाठपुरावा करूनदेखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
संबंधित प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे स्थानिक रहिवाशांनी व वाहनधारकांनी अनेकवेळा रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा करून देखील हा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे एखादा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोट
लोकांच्या मागणीनुसार संबंधित प्रशासनाला लवकरात लवकर कळवून आर. के. नगर रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करू व नागरिकांना चांगला रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देऊ.
- ऋतुराज पाटील, आमदार दक्षिण विधानसभा मतदारसंघ
आर. के. नगर जकात नाक्यापासून भारती विद्यापीठपर्यंतचा रस्ता खड्ड्यांत हरवला असून, रस्ता दुरुस्तीबरोबर रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
- सुदर्शन पाटील, सामाजिक कार्यकर्ते मोरेवाडी
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आजाराचा सामना करावा लागत आहे. श्वसनाचे व मणक्याचे आजार होत आहेत, तसेच खड्डा चुकविण्याच्या नादात छोटेमोठे अपघात होत आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन रस्ता करावा.
- आशिष पाटील, ग्रा. पं. सदस्य, मोरेवाडी